LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Wednesday, July 6, 2022

बोधकथा 41 ते 50

बोथकथा क्रमांक - 41  

प्राणी , पक्षी व मासे

एकदा प्राणी व पक्षी यांची लढाई व्हायची होती. त्यावेळी मासे व प्राणी यांचा असा तह झाला, की माशांनी पक्ष्याविरुद्ध प्राण्यांना मदत करावी. पुढे लवकरच लढाई सुरू झाली. पण त्यावेळी माशांनी असा निरोप पाठविला की जमिनीवर येऊन लढण्यास आम्ही समर्थ नाही.


तात्पर्य


- साहाय्य मिळावे म्हणून ज्यांच्याशी आपण मैत्री करतो त्यांच्याकडून आपल्याला किती साहाय्य मिळेल याचा विस्तार आधीच करावा. म्हणजे ऐनवेळी फजिती व्हायला नको.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 42

पोपट आणि ससाणा

एक ससाणा एका पोपटाला म्हणाला, 'अरे, तुझी चोच इतकी मजबूत असताना सुद्धा तू आपला चरितार्थ नुसती फळं नि किडे खाऊन चालवावास हे बरं वाटत नाही. त्यापेक्षा आमच्यासारखं तुम्हीही मांस खावं हे चांगलं.' ह्या ससाण्याच्या बोलण्याचा पोपटाला इतका राग आला, की त्याने एका शब्दानेही त्याला उत्तर दिले नाही. काही वेळाने तो पोपट एक कबुतराच्या खुराड्यावरून उडत चालला असता तेथे ससाण्याचे प्रेत उलटे टांगून ठेवलेले त्याला दिसले. ते पाहून पोपट म्हणाला, 'अरे, कबुतराच्या मांसावर निर्वाह चालविण्याची इच्छा सोडून जर तू माझ्यासारखाच फळं नि किडे खाऊन राहिला असतास तर ही वेळ तुझ्यावर आली नसती.'


तात्पर्य


- स्वतःच्या भरभराटीच्या काळात जो दुसर्‍याचा उपहास करतो त्याला विपत्ती आली म्हणजे तोच दुसर्‍याच्या उपहासास कारण होतो.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 43  

बोका  आणि कोल्हा

एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, 'अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.'


बोका म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, 'बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं. दुसर्‍याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !' इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्‍याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.


तात्पर्य


- दुसर्‍यापेक्षा मी अधिक शहाणा अशी बढाई मारणार्‍यास त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही. पण ज्याला तो कमी शहाणा समजतो त्याचेच शहाणपण वेळेला उपयोगी पडते. एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्‍या विद्यापासून होणार नाही.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 44  

मोर आणि बगळा

एका मोराने बगळ्याला पाहून आपला सुंदर पिसारा फुलवला व हा कोणी फालतू प्राणी आहे असे मनात आणून त्याला तो आपल्या रंगीत पिसार्‍याचे सौंदर्य दाखवू लागला. त्याचा गर्व कमी व्हावा म्हणून बगळा त्याला म्हणाला, 'अरे, सुंदर पिसं हे तुझ्या मोठेपणाचे लक्षण असतं तर तुमची जात श्रेष्ठ आहे हे मी कबूल केलं असतं, पण मला वाटतं जमिनीवर चालून खेळ खेळण्यात, अन् नाचण्यापेक्षा आकाशात फिरण्याची शक्ती असणं हेच खरं मोठेपणाचं आहे !'


तात्पर्य


- आपल्या अंगी असलेला गुण दुसर्‍याजवळ नसला म्हणजे त्याला हिणवावे असे जर असेल तर दुसर्‍याजवळच्या गुणासाठी त्याने आपल्याला का हिणवू नये ? सगळेच गुण एकाच माणसाजवळ असतात असे नाही म्हणून कोणी कोणास हिणवू नये.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 45  

म्हातारा  आणि तरुण

एक अविचारी तरुण माणूस रस्त्याने चालला असता म्हातारपणामुळे ज्याचे शरीर धनुष्यासारखे वाकले आहे असा एक माणुस त्याला दिसला, तेव्हा तो त्या म्हातार्‍याला म्हणाला, 'बाबा तुमचं हे धनुष्य मला विकत देता का ?' म्हातारा त्यावर म्हणाला, 'तुम्ही पैसे खर्च करून धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे थांबाल तर बिनपैशाने असंच धनुष्य तुम्हाला मिळेल, कारण तुम्हाला म्हातारपण आलं म्हणजे तुमच्याही शरीराचं असंच धनुष्य होणार आहे.' हे ऐकताच तो तरुण माणूस खाली मान घालून निमूटपणे चालता झाला.


तात्पर्य


- माणसाला म्हातारपणामुळे निर्माण झालेल्या वैगुण्याबद्दल त्याची चेष्टा करून त्यात आनंद मानणे हे माणूसकीचे लक्षण नव्हे.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 46  

वांव मासा व साप

वांव या नावाचा एक मासा आहे. त्याचा आकार सापासारखा असतो. त्या जातीचा एक मासा एकदा एका सापाला म्हणाला, 'अरे, तुझा नि माझा आकार इतका सारखा आहे की, त्यावरून तुझं आणि माझं नक्की काहीतरी नातं असलं पाहिजे असं मला वाटतं. पण लोक मलाच तेवढं पकडून नेतात पण तुझ्या वाटेला कोणीही जात नाही. याचं कारण काय ?' साप त्यावर म्हणाला, 'मित्रा, याचं कारण असं की लोक माझ्या वाटेला गेले तर मी त्यांना उलट अशी शिक्षा करतो की त्यामुळे त्यांना चांगलीच आठवण राहावी.


तात्पर्य


- त्रास देणार्‍या माणसाला नमून राहणे म्हणजे त्याला त्रास देण्याच्या कामी उत्तेजन देणे होय.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 47  

कोल्हा आणि द्राक्षे

एक भुकेलेला कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मांडवाखाली आला. वर पाहतो तर सुंदर पिकलेले द्राक्षांचे घड लागले आहेत. पण मांडव उंच असल्यामुळे ते त्याला हाती लागेनात. त्याने खूप उड्या मारल्या. पण एकही द्राक्ष त्याला मिळाले नाही. मग थोडे दूर जाऊन द्राक्षाकडे बघत तो म्हणाला, 'ही द्राक्षे ज्याला कोणाला हवीत त्याने घ्यावी. पण ती हिरवी अन् आंबट आहेत म्हणून मी सोडून जातो.'


तात्पर्य


- एखादी वस्तु आपल्याला मिळाली नाही म्हणजे आपला कमीपणा लपवून त्या वस्तूलाच दोष देणारे बरेचजण असतात.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 48  

कोल्हा व बोकड

एक कोल्हा एका विहीरीवर पाणी प्यायला गेला असता विहिरीत पडला. त्याने विहिरीतून वर येण्याचा खूप प्रयत्‍न केला, पण काही उपयोग होईना. इतक्यात तेथे एक बोकड आला व कोल्ह्याला म्हणू लागला, 'अरे, हे पाणी चांगलं का ?' कोल्हा त्यावर म्हणाला, 'अरे मित्रा, पाणी किती चांगलं आहे म्हणून सांगू ? अगदी अमृताइतकं गोड पाणी आहे हे. कितीही प्यालं तरी माझं समाधान होत नाही.' हे ऐकताच बोकडाने आत उडी मारली. त्याची शिंगे मोठी होती, त्याच्यावर पाय देऊन कोल्हा उडी मारून लगेचच विहिरीतून बाहेर आला व बिचारा बोकड पाण्यात गटांगळ्या खात बुडून मरण पावला.


तात्पर्य


- कोणतीही गोष्ट लोक स्वार्थासाठी करतात, मग दुसर्‍याचा नाश झाला तरी चालेल. म्हणून जो कोणी लालूच दाखवेल त्या माणसाच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये.


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 49  

कारकून व कारभारी

एका कारकुनाचा एक बालपणाचा मित्र होता. त्याला एका संस्थानात कारभार्‍याची नोकरी मिळाली. ही गोष्ट त्या कारकुनाला समजताच तो त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे गेला व म्हणाला, 'मित्रा, तुला ही मोठी हुद्याची जागा मिळाली. याबद्दल मला फार आनंद होतो आहे.' त्यावर तो कारभारी म्हणाला, 'अरे, पण तू कोण आहेस ते तर मला कळू देत. तुझं नाव काय ?' यावर तो कारकून म्हणाला, 'तुम्हांला हा जो एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला आहे त्याबद्दल दुःख प्रदर्शित करण्यासाठी मी आलो आहे. तुमच्या या स्थितीबद्दल मला फार वाईट वाटतं. कारण जी स्थिती प्राप्त झाली असता माणसाला उन्माद येतो की त्याला आपल्या जुन्या मित्राचीही ओळख पटत नाही. त्या स्थितीबद्दल त्या माणसाची कीव कोणाला येणार नाही ?'


तात्पर्य


- अधिकार व सत्ता यांच्या प्राप्तीमुळे ज्याच्या स्वभावात फरक पडत नाही. असे लोक कमीच !


-----------------------------

बोथकथा क्रमांक - 50 

चाकावरील माशी

एक घोडागाडी जोरात चालली असता तिच्या चाकावर बसून एक माशी स्वतःशीच म्हणाली, 'मी किती धूळ उडवते आहे !' काही वेळाने ती माशी घोड्याच्या पाठीवर बसली व पुन्हा आपल्याशीच म्हणाली, 'घोड्याला पळायला लावणारं माझ्यासारखं दुसरं कोणी आहे का ?'


तात्पर्य


- दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे घेउन त्याबद्दल बढाई मारीत बसण्याची बर्‍याच लोकांना सवय असते


-----------------------------

No comments:

Post a Comment