LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


बास्केटबॉल

बास्केटबॉल 

-------------------------------

खेळाडू,मैदान व काही नियम

प्रत्येकी पाच खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा, मूळचा अंतर्गेही व नंतर मैदानी स्वरूपाचा एक खेळ, 

सर्वसाधारणपणे २८.६६ मी. (९४ फुट) लांब व १५.२४ मी. (५० फुट) रुंद प्रांगणाच्या दोन्ही टोकांना पांढऱ्या दोरखंडाच्या जाळ्याची बिनबुडाची टोपली एका लोखंडी कडीपासून लोंबकळत सोडलेली असते. त्या कडीचा व्यास ०.४६ मी. (१८ इंच) असून ती जमिनीपासून ३.०५ मी. (१० फुट) उंचीवर असलेल्या एका पार्श्वफलकाला जोडलेली असते. 

चेंडू 

चेंडू गोलाकार असून त्याला बाहेरून कातड्याचे वेष्टन व आत रबराची फुगवलेली पिशवी असते. त्याचा परिघ कमीत कमी ७५ सेंमी. (२ फुट साडे पाच इंच) ते जास्तीत जास्त ७८ सेंमी. २ फुट सहा पुर्णांक तीन चतुर्थांश इंच असतो. त्याचे वजन ६०० ग्रॅमपेक्षा कमी असू नये, असा दंडक आहे. 


एका संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या हद्दीतील टोपलीत चेंडू टाकून गोल करणे व गुण संपादणे व त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघास गोल करण्यास अटकाव करणे हे या खेळाचे स्थूल मानाने स्वरूप होय.

बास्केटबॉल खेळाचा इतिहास

हा खेळ अमेरिकेमध्ये स्प्रिंगफील्ड येथील वाय्. एम्. सी. ए. कॉलेजचे क्रीडाशिक्षक जेम्स नेस्मिथ यांनी १८९१ मध्ये शोधून काढला. मैदानी खेळांना प्रतिकूल अशा हिवाळी मोसमात बंदिस्त जागेत खेळाडूंना भरपूर व्यायाम देणारा व मनोरंजक खेळ उपलब्ध व्हावा, या उद्देशापोटी या खेळाचा उगम झाला. व्यायामशाळेच्या समोरासमोरील भिंतींना ३.०५ मी. उंचीवर टोपल्या (बास्केट) बांधून फुटबॉलसारखा चेंडू वापरून हा खेळ प्रथम खेळला जात असे; म्हणून त्यास ‘बास्केटबॉल’ नाव पडले. त्यात १९०६ पासून बास्केटच्याजागी लोखंडी कडीचा व त्यास अडकवलेल्या आणि बिनबुडाच्या जाळीचा वापर सुरू झाला; कारण प्रत्येक वेळी टोपलीत अडकलेला चेंडू शिडीच्या साहाय्याने काढावा लागे. सुरुवातीस नेस्मिथ यांनी तयार केलेल्या साध्यासुध्या प्राथमिक नियमांच्या आधारे, प्रत्येक संघात चाळीस ते पन्नास खेळाडू घेऊन हा खेळ खेळीत. या खेळाचे प्रमाणित नियम १९१५ मध्ये प्रथम आखण्यात आले. अमेरिकेपाठोपाठ रशिया, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा, ईजिप्त, हंगेरी, ब्राझील, अर्जेंटिना, फिनलंड, मेक्सिको, चेकोस्लोव्हाकिया, चिली, क्यूबा इ. लहान-मोठ्या देशांत या खेळाचा प्रसार झाला. १९०४ च्या सेंट लूइस ऑलिंपियाडमध्ये या खेळाला प्रदर्शनी दर्जा मिळाला व १९३६ च्या बर्लिन येथील ऑलिंपिक सामन्यापासून तो ऑलिंपिकमध्ये मान्यवर खेळ म्हणून अंतर्भूत करण्यात आला. या पहिल्या सामन्यात २२ देशांच्या संघांनी भाग घेतला होता. अमेरिकेचा हा प्रमुख खेळ असून त्या देशाने या स्पर्धांमध्ये विशेषेकरून प्रावीण्य मिळवल्याचे दिसून येते. ऑलिंपिक स्पर्धांतील अनुभवांच्या आधारे खेळाच्या नियमावलीत नंतर काही बदल करण्यात आले. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बास्केटबॉल’ ही संघटना १९३२ मध्ये स्थापन झाली. सध्या तिची ऐंशीपेक्षा अधिक राष्ट्रे सभासद आहेत.

----------------------------------

बास्केटबॉल खेळाचे नियम

‘इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन’ च्या नियमांनुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमांनुसार होत असले, तरी कित्येक देशांत पुरुषांच्या नियमांत काही फेरफार करून स्त्रिया हा खेळ खेळतात. बास्केटबॉलचा सामना प्रत्येकी वीस मिनिटांच्या दोन भागांमध्ये खेळला जातो. मध्यंतरी दहा मिनिटांची विश्रांती असते. खेळाच्या प्रारंभी दोन्ही संघांचे मध्यवर्ती खेळाडू (सेंटर) मध्यवर्तुळात एकमेकांकडे व आपापल्या टोपलीकडे तोंड करून, डावा हात मागे ठेवून उभे राहतात. पंच मध्यभागी येऊन त्यांच्यामध्ये साधारण २ ते २.५ मी. (७ - ८ फुट) उंच हवेत चेंडू उडवितो. तो हवेत पूर्णपणे उंच गेल्यावरच खेळाडूस त्यास स्पर्शण्याची वा हाताने मारण्याची परवानगी असते. आरंभाप्रमाणेच दहा मिनिटांच्या मध्यंतरानंतर तसेच तांत्रिक नियमभंग होऊन मुक्तफेक केल्यानंतरही ही क्रिया केली जाते. प्रत्येक संघात पाच खेळाडू असतात. त्यांची स्थाने ठरलेली असतात. क्रमांक एक व दोनचे खेळाडू बचावाचे वा रक्षणाचे कार्य करतात, त्यांना अनुक्रमे ‘लेफ्ट गार्ड’ (डावीकडील रक्षक) व ‘राइट गार्ड’ (उजवीकडील रक्षक) म्हणतात. प्रतिपक्षाला आपल्या टोपलीत चेंडू टाकू न देणे व अशा रीतीने गोल होऊ न देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होय. क्रमांक तीन, चार व पाच या खेळाडूंना अनुक्रमे ‘लेफ्ट फॉरवर्ड’ (डावा आघाडी), ‘सेंटर’ (मध्यवर्ती) व ‘राइट फॉरवर्ड’ (उजवी आघाडी) अशी नावे आहेत. हे खेळाडू चढाई करतात. यांखेरीज प्रत्येक संघाला बदली खेळाडू खेळवता येतात. खेळामध्ये पाच वेळा खेळाडूंची बदली करता येते. रक्षकांनी बचाव करताना हाती आलेला चेंडू आघाडीपैकी जो खेळाडू मोकळा असेल, त्याच्याकडे फेकावयाचा असतो. चढाई करणारांनी चेंडू आपल्या ताब्यात घेऊन तो आपापसांत फेकावयाचा व प्रतिपक्षाच्या प्रांगणात जाऊन त्याच्या हद्दीतील टोपलीत तो वरून खाली टाकावयाचा असतो. वस्तुतः प्रत्येक खेळाडूसच बचावाचे व चढाईचे कार्य करावे लागते. हा खेळ अत्यंत गतिमान असल्याने प्रत्येक खेळाडू दक्ष व चपळ असावा लागतो व त्यास सतत धावपळ करावी लागते. खेळाच्या नियमांनुसार खेळाडूंना चेंडू हातात घेऊन एका पावलापेक्षा जास्त पुढे, मागे वा बाजूला जाता येत नाही. चेंडू जमिनीवर एका हाताने आपटून टप पाडीतच त्याला जाता येते, अथवा आपल्या जागेवरूनच त्याला आपल्या संघातील दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू फेकता येतो. चेंडू घेऊन पळत सुटणे, तसेच चेंडू पायाने मारणे वा गुद्दा मारणे हे निषिद्ध मानले जाते. प्रतिपक्षी खेळाडूस धरून ठेवल्यास, ढकलल्यास, अडखळून पाडल्यास ते वर्तन व्यक्तिगत नियमभंगाच्या (पर्सनल फाउल) सदरात येते व त्याचा फायदा प्रतिपक्षास मिळतो. ज्याच्या विरुद्ध असा नियमभंग घडला असेल त्या खेळाडूस मुक्तफेकीच्या रेषेपासून (फ्री थ्रो लाइन) प्रतिपक्षाच्या टोपलीत सरळ चेंडूफेक करण्याची संधी मिळते. खेळाडूंना धक्काबुक्की करण्याव्यतिरिक्त खेळ लांबवणे, खेळताना मधूनच बाहेर जाणे वगैरे तांत्रिक नियमभंग एखाद्या संघाकडून घडल्यासही त्याच्या प्रतिपक्षास मुक्तफेकीची संधी मिळते. मात्र अशा मुक्तफेकीने गोल झाल्यास त्यास फक्त एक गुण मिळतो. एरव्ही खेळताना झालेल्या गोलास (फील्ड गोल) २ गुण असतात. खेळताना चेंडू प्रांगणाबाहेर गेल्यास, ज्या संघाने तो बाहेर घालवला असेल, त्याच्या विरुद्ध संघास तो जेथून बाहेर गेला असेल, त्या ठिकाणाहून आत फेकता येतो. तसेच गोल झाला की, चेंडू पुन्हा मध्यभागी न आणता तिकडील प्रांगणातील खेळाडूंपैकी एकाने तो अंतिम रेषेपासून आत फेकावयाचा असतो. यामागे वेळ वाचवण्याचा उद्देश असतो. तसेच खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी वा खेळाडू जखमी झाल्यास प्रत्येक संघास तीन वेळा एकेक मिनिटाचा कालावधी (टाइम आउट) मागून घेता येतो. हा अवधीही पुढे वेळ वाढवून भरून काढला जातो. त्यामुळे प्रत्येक डाव संपूर्ण वीस मिनिटांचा होतो. खेळाच्या शेवटी जो संघ जास्त गुण मिळवेल तो विजयी ठरतो.


बास्केटबॉल खेळामधील मूलभूत कौशल्ये

----------------------------------

(१) टोपलीतील अचूक चेंडूफेक (शूटिंग):

 प्रत्येक खेळाडूस यशस्वी रीत्या चेंडू टोपलीत फेकणे अवगत असावे लागते. चेंडूफेकीच्या सामान्यतः तीन पद्धती आहेत. दोन्ही हातांनी छातीजवळून चेंडू फेकणे, एका हाताने चेंडू टोपलीत फेकणे व तिसरी म्हणजे नियमभंगानंतरची टोपलीतील चेंडूफेक (फाउलशॉट). व्यक्तिगत वा तांत्रिक नियमभंगानंतर, मुक्तफेकीच्या रेषेपासून चेंडू टोपलीत फेकण्याची संधी, तो नियमभंग प्रत्येक खेळाडूच्या संदर्भात घडण्याची शक्यता असल्याने, जवळजवळ प्रत्येकाला लाभते. त्या दृष्टीने हे तंत्र त्याने आत्मसात करणे आवश्यक ठरते. छातीजवळ चेंडू धरून तो जसा वरून जाळ्यात फेकता येतो, तद्वतच चेंडू मांड्यांसमोर धरून तो खालून वर अशा दिशेने (अंडरहँड थ्रो) पण वरून टोपलीत पडेल अशा उंचीच्या अंदाजाने फेकता येतो.


(२) चेंडूची कौशल्यपूर्वक हाताळणी (हँडलिंग द बॉल) :

यात चेंडू झेलणे (कॅचिंग), तो आपल्या खेळाडूकडे फेकणे (पासिंग) व तो टप्पे पाडत नेणे (ड्रिब्लिंग) या कौशल्यांचा समावेश होतो.


(३) पदलालित्य (फुटवर्क) :

उत्तम पदलालित्यासाठी शरीराचा लवचिकपणा, चपळपणा व तोल सावरण्याचे कौशल्य या गोष्टींची आवश्यकता असते. तसेच हा खेळ अत्यंत गतिमान असल्याने धावण्याचे कौशल्य खास करून असावे लागते. पुढे धाव घेणे, धावताना एकदम गती वाढवणे वा कमी करणे, चटकन थांबणे या क्रियांवर खेळाडूची विलक्षण हुकूमत असावी लागते. थांबताना एक पाय पुढे व दुसरा मागे ठेवून थांबणे जास्त हितावह असते. कारण या स्थितीत एक पाय स्थिर ठेवून दुसऱ्या पायावर चटकन गिरकी (पिव्हट) घेता येते. तसेच प्रतिपक्षातील खेळाडूला यशस्वी रीत्या हुलकावण्या देऊन चेंडू आपल्या ताब्यात ठेवणे वा त्याच्याकडून काढून घेणे यावरही खेळाची यशस्वीता बव्हंशी अवलंबून असते. वरील कौशल्यांचा वापर करून, तसेच परिस्थितीनुरूप बचाव व आक्रमण यांचा मेळ साधून हा खेळ अत्यंत चुरशीने खेळता येतो. अत्यंत अल्प साधनांनी व अल्प वेळात या खेळाद्वारे भरपूर व्यायाम होऊन खेळाडूंचा दम, वेग, अचूकता, सहकार्य व संघचातुर्य इ. गुणांचे पोषण होते आणि अन्य व्यायामी व मैदानी खेळांस ते पूरक ठरते.

No comments:

Post a Comment