LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


बोधकथा 11 ते 20

कथा क्रमांक -11 

फासेपारधी व पक्षी

एका पारध्याने शेतात पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो एका झाडाआड लपून जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात ते पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडे थोडे पक्षी तेथे दिवसभर येत होते. पण ते अगदी थोडे असल्यामुळे त्यांना पकडावे असे त्या पारध्याला वाटले नाही. खूप पक्षी एकदम पकडावे असे त्याच्या मनात होते. शेवटी संध्याकाळ झाली व सगळे पक्षी आपापल्या घरट्यात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने जाळे काढून घेतले व नशिबाला दोष देत तो घरी गेला.

तात्पर्य

- कोणत्याही कामात उतावीळपणा जसा चांगला नाही त्याप्रमाणे दिरंगाईही योग्य नाही.

-----------------------

 कथा क्रमांक -12

पक्षी आणि पारधी

एक पारधी अरण्यात पक्षी धरण्यासाठी जाळे लावत असता जवळच झाडावर बसलेला एक पक्षी त्याला विचारू लागला, 'अरे, हे तू काय करतो आहेस?' यावर पारधी म्हणाला, 'तुमच्यासारख्या पक्ष्यांकरता हे शहर बांधतो आहे. यात जे पक्षी येऊन राहतील त्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. चारा, पाणी चिकार असेल. राहायला तरतर्‍हेची घरं अन् झोपायला मऊ गादी असेल.' पक्षाला ते सर्व खरे वाटले व पारधी जाताच तो त्या जाळ्यात शिरला व अडकला. ते पाहून बरेच पक्षी जमा झाले तेव्हा त्या सर्वांना त्याने सावध केले. तो सांगू लागला, 'यात मी फसून सापडलो, तो पारधी गोड गोड बोलून तुम्हालाही भुलविण्याचा प्रयत्‍न करेल. त्यावर तुम्ही विश्‍वास ठेऊ नका.' हे ऐकून सगळे पक्षी निघून गेले. काही वेळाने पारधी येताच तो पक्षी त्याला म्हणाला, 'अरे लबाडा, तू मला फसवलेस, पण तुझ्या या सुंदर शहरात आता एकही पक्षी राहायला येणार नाही, याबद्दल खात्री असू दे !'

तात्पर्य

- लबाड लोकांची लबाडी जोवर लक्षात येत नाही तोवर ते दुसर्‍याला फसवू शकतात पण लबाडी उघडकीला आली की लोक त्याच्या वार्‍यालाही उभे रहात नाहीत.

-----------------------

कथा क्रमांक -13

मूर्ख लांडगा

एकदा रात्री एका बाईचे हट्टी मूल फार रडू लागले. त्याला शांत करण्यासाठी आईने फार प्रयत्‍न केले, पण ते ऐकेना. शेवटी भीती दाखवावी म्हणून ती मुलाला म्हणाली, जर तू गप्प झाला नाहीस तर तुला दारात आलेल्या लांडग्याला देऊन टाकेन.' त्याच वेळी एक लांडगा खरोखरच दाराशी आला होता. त्याने बोलणे ऐकले व बोलल्याप्रमाणे आई मुलाला आपल्या स्वाधीन करेल अशा आशेने तो तेथेच थांबला. शेवटी मूल रडून थकले व झोपी गेले. मग त्या लांडग्याला उपाशीच रानात जावे लागले. वाटेत त्याला कोल्हा भेटला, त्याने विचारले, 'मित्रा, तू ठीक आहेस ना?' लांडगा म्हणाला, 'अरे मित्रा, ते काही विचारू नकोस. मी वेडा एका बाईचं खोटं बोलणं खरं मानून फसलो नि सगळी रात्र उपास आणि जागरण करून कंटाळून गेलो.'

तात्पर्य

- एखाद्याच्या बोलण्यात सहज निघालेल्या शब्दावर विश्वास ठेवू नये, त्या शब्दांचा मागचा पुढचा संबंध काय आहे हे लक्षात न घेणे मूर्खपणाचे होय.

-----------------------

कथा क्रमांक -14

म्हातारा व मृत्यू

एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत घराकडे चालला. वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा टाकत खाली बसला. त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.' ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्‍याच्या पुढे येऊन उभा राहिला व त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्‍या म्हातार्‍याला माहीत नव्हते. मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्‍याची भितीने गाळण उडाली. मग थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.'

तात्पर्य

- मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे तोवरच ह्या गोष्टी.

-----------------------

कथा क्रमांक -15

म्हातारा आणि त्याचा घोडा

एक म्हातारा व त्याचा मुलगा आपला घोडा विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हातार्‍याला म्हणाला, 'हा लहान मुलगा पायी चालला आहे, त्यापेक्षा तू त्याला घोड्यावर बसव.' ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला घोड्यावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला. पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला, 'आळशी पोरा, तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला घोड्यावर बसून जायची लाज वाटत नाही का?' ते ऐकताच म्हातार्‍याने मुलाला खाली उतरवले व आपण घोड्यावर बसून निघाला. थोडे पुढे जाताच दोन स्त्रिया त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या, 'म्हातारा पहा, लहान मूल पायी चाललं असता आपण घोड्यावर बसून कसा चालला आहे?' ते ऐकताच त्याने मुलाला आपल्या मागे घोड्यावर बसवून घेतले. ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो, 'हा घोडा तुमचाच का?' म्हातारा म्हणाला, 'हो.' माणूस म्हणाला, 'मला काही खरं वाटत नाही, कारण हा जर तुमचा असता तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते. दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात, त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही?' ते ऐकताच दोघेही घोड्यावरून खाली उतरले व त्या घोड्याला आडवे करून त्यांनी त्याचे पाय बांधले. मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले. ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळया पिटून मोठमोठ्याने हसू लागले. तो आवाज ऐकून घोडा बिचकला व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले. दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात तो पडला व बुडून मरण पावला.

तात्पर्य

- प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व प्रत्येकाला खूष करणे हे काम फार कठीण आहे.

-----------------------

कथा क्रमांक -16

्हातारा व दारूचे पिंप

एक म्हातारा मोठा दारूबाज होता. एकदा त्याने दारूचे एक रिकामे पिंप पाहिले. त्यात दारू नव्हती तरी त्याला जो दारूचा वास येत होता तो घेण्यात त्या म्हातार्‍याला मोठा आनंद वाटला. त्याने आपले नाक त्या पिंपाला जे भोक होते त्यास लावले व आपल्याशीच म्हणाला, 'ज्या दारूचा वास इतका चांगला आहे, ती दारू किती मधुर असेल.

तात्पर्य

- शितावरून भाताची परीक्षा होते.

-----------------------

कथा क्रमांक -17

एक माणूस व त्याचा मूर्ख नोकर

एका माणसाचा नोकर महामूर्ख होता. त्याला तो माणूस सारखा, 'तू मूर्खांचा राजा आहेस.' असे म्हणत असे. एकदा तो याप्रमाणे बोलत असता तो नोकर संतापून त्याला म्हणाला, 'तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खरोखरच सगळ्या मूर्खांचा राजा झालो तर फार बरं होईल, कारण मग जगातले तुमच्यासारखे सगळे लोक माझे प्रजानन होतील.'

तात्पर्य

- वस्तुतः जगातले सगळेच लोक मूर्ख असतात, पण जो कमी मूर्ख असेल तो स्वतःला मोठा शहाणा समजतो इतकेच.

-----------------------

कथा क्रमांक -18

लोभी माणूस

एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.'

तात्पर्य

- लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ?

-----------------------

कथा क्रमांक -19 

लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी

एका मुसलमानाच्या घरी टोपलीत काही कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यातील एक अगदीच लठ्ठ व एक अगदीच बारीक होती. ती लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडीची नेहमी चेष्टा करून हिणवीत असे. एकदा त्या मुसलमानाकडे मेजवानी होती. तेव्हा त्याने नोकराला सांगितले की, 'ह्या कोंबड्यात जी लठ्ठ कोंबडी असेल तिला मारून तिची कढी करा.' त्याप्रमाणे नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडीला मारू लागला तेव्हा ती आपल्याच मनाशी म्हणाली, 'मी जर त्या दुसर्‍या कोंबडीसारखी बारीक असते, तर आज माझ्यावर हा प्रसंग नक्कीच आला नसता.'

तात्पर्य

- ज्या गोष्टीमुळे माणसाला गर्व येतो तीच गोष्ट दुःखाला पण कारणीभूत होऊ शकते हे विसरू नये.

-----------------------

कथा क्रमांक -20 

कुत्रा आणि लांडगा

एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, 'तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचं कारण तरी काय ? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.' कुत्रा म्हणाला, 'अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.' त्यावर लांडग्याने विचारले, 'तू काय करतोस ?' कुत्रा म्हणाला, 'दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.' लांडगा म्हणाला, 'एवढंच ना ? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरं काय पाहिजे ?' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असतां कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, 'मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?' कुत्रा म्हणाला, 'अं हं. ते काही नाही.' लांडगा म्हणाला, 'तरी पण काय ते मला कळू देत.' कुत्रा म्हणाला, 'अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो, पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेनं वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तूही सुखी होशील.' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, 'अरे, असा पळतोस काय?' लांडगा दुरूनच म्हणाला, 'नको रे बाबा मला ते सुख, ते तुझं तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसं वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखं बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केलं तर ते राजेपणदेखील मला नको !'

तात्पर्य

- स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.

-----------------------

No comments:

Post a Comment