LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


बुद्धिबळ

बुद्धिबळ

----------------------------------

बौद्धिक कौशल्यावर आधारलेला एक बैठा खेळ. चौसष्ट घरे (चौरस) असलेल्या पटावर प्रत्येकी सोळा सोंगट्या मांडून दोन खेळाडू तो खेळतात. बहुतेक खेळांत यश मिळविण्यामध्ये कौशल्याबरोबरच योगायोगाचाही भाग असतो. मात्र बुद्धिबळाच्या खेळात योगायोग मुळीच नसतो, तर केवळ बुद्धिचातुर्याच्या आणि तंत्रकौशल्याच्या बळावरच खेळाडूला विजय हस्तगत करता येतो. चतुरंग : चतुरंग हा मूळ भारतीय खेळ असून, प्राचीन काळी तो ‘चतुरंग’ या नावाने ओळखला जात असे. हा खेळ प्राचीन काळी भारतातच सुरू झाला, हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’चे अध्यक्ष सर विल्यम जोन्स, ऑक्सफर्डचे टॉमस हाइड तसेच मरी, स्टॉन्टन इ. अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम भारतातच झाला असल्याचे दाखवून दिले आहे. सिंहासन बत्तिशीमध्ये व काही पुराणांतही या खेळाचे उल्लेख सापडतात. इ.स. पाचव्या शतकापासून या खेळाचे निश्चित उल्लेख सापडतात. भारतातून हा खेळ इराण, अरबस्तानमार्गे यूरोपमध्ये तसेच काश्मीरमार्गे चीनमध्ये जाऊन तेथून कोरिया, जपान इ. ठिकाणी प्रसृत झाला असावा. रशियात तो तिबेट, पर्शियामार्गे गेला असण्याचा संभव आहे. पर्शियन ‘छतरंग’, अरबी ‘शतरंज’, मलायी ‘छतोर’ मंगोल ‘शतर’ चिनी ‘सियांकी; इ. मूळ संस्कृत चतुरंगाचीच विविध रूपे होत. भारतात इ.स. पाचव्या व सहाव्या शतकांच्या सुमारास चतुरंग खेळला जात होता. भारतीय युद्धातील रथ, हत्ती, घोडे, व पायदळ या चतुरंग सेनेवरून या खेळाला हे नाव पडले. चतुरंग केव्हा सुरू झाला असावा, याविषयी अनेक मते आढळतात.तो इ.स. पू. चार हजार वर्षांपूर्वी सुरू झाला असावा, असे काही विद्वानांचे मत आहे. कार्नामक-इ-आर्तखत्री या पेहलवी भाषेतील ग्रंथात इ.स. ५५० च्या सुमाराला चतुरंग हा खेळ इराणमध्ये प्रचलित असल्याचा उल्लेख सापडतो. हारून-अल्-रशीद बादशहाचा मुलगा मुसासिक बिल्ला खलीफ याने रचलेला ‘अल्ली शतरंज’ हा डावही प्रसिद्ध आहे. चतुरंग या खेळाचे शतरंज हे नाव अद्यापही भारताच्या काही भागांत प्रचलित आहे. बंगाली संशोधक मनमोहन घोष आणि त्यांचे शिष्य चक्रवर्ती यांनी चतुरंग या खेळात बदल होत त्याला बुद्धिबळाचे स्वरूप कसे आले, याची संशोधनपूर्वक माहिती दिलेली आहे. चतुरंग या प्राचीन खेळात चार खेळाडू आणि चार रंगांच्या (काळा, हिरवा, तांबडा व पिवळा) सोंगट्या असत. प्रत्येक खेळाडूकडे राजा, हत्ती, घोडा, नौका आणि चार प्यादी अशा आठ सोंगट्या असत. पटात चौसष्ट घरे असत. चार खेळाडूंपैकी एकमेकांसमोरचे खेळाडू भागीदार होऊन त्यांच्याकडे हिरव्या-काळ्या आणि तांबड्या -पिवळ्या सोंगट्या येत. पटाच्या चार कोपऱ्यांमध्ये पहिल्या ओळीत राजा, हत्ती, घोडा, नौका किंवा रथ व पुढच्या ओळीत समोर चार प्यादी अशी मांडणी करून, फासे टाकून खेळत असत. राजा, हत्ती, घोडा, नौका आणि प्यादी यांना अनुक्रमे ५,४,३,२, व १ असे गुण दिले जात. दान पडेल त्याप्रमाणे प्यादे, हत्ती, घोडा किंवा नौका (रथ) यांची खेळी असे. घोडा, हत्ती, राजा यांच्या चाली सध्याच्या बुद्धिबळाप्रमाणेच होत्या. रथ किंवा नौका किंवा उंट या मोहऱ्याची चालही तिरपी असे, परंतु ते उडी मारून दोनच घरे जात असे. या सर्व खेळ्या दान पडेल त्याप्रमाणे खेळावयाच्या असल्याने हळूहळू हा खेळ पूर्णपणे द्यूतमय होऊ लागला. याला ‘अष्टपद’ किंवा ‘अष्टक्रीडा’ असेही म्हणत असत. या खेळाचा उल्लेख संस्कृत, पाली आणि इतर बौद्ध वाङ्मयातही सापडतो. चतुरंग या खेळाला जे जुगारी स्वरूप प्राप्त झाले, त्याचा अतिरेक म्हणजे या जुगारामध्ये खेळणारे आपली स्थावर व जंगम मालमत्ता, आपले सर्वस्व पणाला लावीतच; पण ते हरल्यावर आपल्या शरीराचे अवयव- हाताची बोटे, हातपाय इ. -पणाला लावीत व हरल्यास ते अवयव तोडून देत. भारतात हस्तिदंताचा जास्तीत जास्त उपयोग बुद्धिबळाची मोहरी व प्यादी करण्यासाठी केला जात असल्याचा निर्देश इ.श. ९५० मध्ये अल्-मसूदी या अरबी इतिहासकाराने केला आहे. या मोहऱ्यांचे व प्याद्यांचे आकार एवढे मोठे असत, की त्यांची ने-आण नोकरांकरवीच केली जात असे. पुढे कडक, राजकीय निर्बंधामुळे चतुरंगामधून फाशांचे उच्चाटन करण्यात आले. चौघांऐवजी हा खेळ दोघांमध्ये खेळला जाऊ लागला. प्रत्येकाचे दोन हत्ती, दोन रथ , दोन घोडे, एक राजा, एक वजीर व आठ प्यादी असे चतुरंगाचे बुद्धिबळामध्ये परिवर्तन साधारणपणे सहाव्या-सातव्या शतकात घडले असावे. मात्र खेळाचे नाव चतुरंग हेच राहिले. मोहऱ्यांच्या आणि प्याद्यांच्या हालचालीही निश्चित करण्यात आल्या, फासे वापरण्यावर बंदी आल्याने खेळातील दैवाधीनता संपुष्टात येऊन केवळ बौद्धिक कौशल्यासच प्राधान्य आले. पाचव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत भारतात बुद्धिबळाच्या खेळात अनेक परिवर्तने होत गेली. याच काळात तो जगभर प्रसृतही होत गेला. हा खेळ युद्धसदृश्य असल्याने राजेरजवाड्यांमध्ये तो अत्यंत लोकप्रिय होता. कित्येक राजांनी व सरदारांनी आपल्या पदरी निष्णात बुद्धिबळपटू बाळगले होते.

मोगल साम्राज्यकाळात उत्तर भारतात हा खेळ फारच लोकप्रिय झाला. जहांगीर बादशहाला बुद्धिबळाचा फार शौक होता. साधारणपणे अठराव्या शतकापर्यंत भारतामध्ये भारतीय व यूरोपमध्ये पाश्चात्य पद्धतींनुसार हा खेळ खेळला जाऊ लागला. बुद्धिबळाच्या खेळावर पहिले पुस्तक सु.१५७४ मध्ये प्रसिद्ध झाले. तेव्हापासून आजपावेतो जितकी विपुल ग्रंथनिर्मिती झाली आहे, तितकी अन्य कोठल्याही खेळावर झाल्याचे दिसून येत नाही. सतराव्या व अठराव्या शतकांतील फीलीदॉरने ॲनलिसिस ऑफ चेस (१७४९) हे पुस्तक लिहिले; त्यात त्याने सुरुवातीच्या खेळ्या, प्याद्याचे डावातील महत्त्व, डावाच्या अंतिम पर्वातील ह्त्ती व घोडा यांच्या हालचाली यांविषयीचे महत्त्वपूर्ण व विस्तृत विवेचन केले आहे. स्टॉन्टनने चेस प्लेयर्स क्रॉनिकल (१८४१) हे मासिक सुरू केले व १८४६ मध्ये चेस प्लेयर्स हँडबुक हे पुस्तक प्रसिद्ध केले. याच सुमारास फ्रेंच, जर्मन व रशियन भाषांतही अनेक पुस्तके लिहिली गेली. दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी असलेल्या त्रिवेंगडाचार्यांनी बुद्धिबळावर संस्कृतमध्ये विलासमणिमन्जरी नामक ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी या खेळाचे पाश्चात्य, चिनी तसेच दाक्षिणात्य, कर्नाटक, मिश्र कर्नाटक महाविलास (१० × १० म्हणजेच १०० घरांचा पट) इ. प्रकारांचा तौलनिक परामर्ष घेतला आहे. या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर एम्.डी. क्रूझ यांनी १८१४ मध्ये प्रसिद्ध केले. भारतामध्ये मार्च १९७९ पासून बुद्धीबळावर चेस इंडिया हे त्रैमासिक मद्रासहून प्रसिद्ध होत असते. सध्या त्याचे मानद संपादक मॅअन्युल एरन हे आहेत. प्राचीन चतुरंग आणि प्रचलित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ : प्राचीन चतुरंगामध्ये पुढील बंधने होती : (१) प्याद्याची एक घर चालण्याची क्षमता, (२) प्यादे अंती ज्या मोहोऱ्याच्या घरात पोहोचेल, त्याच मोहोऱ्यात त्याचे बढतीने रूपांतर करण्याचे बंधन, (३)प्यादे-वाटमारीचा अभाव, (४) शह दिल्याशिवाय राजा न हलणे, (५) राजाच्या किल्लेकोटाची (कॅसलिंग) अनुपस्थिती, (६) वजीराच्या चालीवर बंधने. अशा जाचक बंधनांमुळे प्राचीन चतुरंगामध्ये एका बाजूची सर्व मोहोरी मारली गेली, म्हणजे ‘बुर्जी’ होण्याचा एक कनिष्ठ प्रकारचा डाव होत असे; तसेच ‘जोराजोरी’, ‘मारामारी’ अशा प्रकारच्या गौण डावांनाही मान्यता होती. जोराजोरीत पटावरील बुद्धिबळाला स्व-पक्षाचा जोर असेल तर ते मारता येत नसे. प्राचीन चतुरंगात श्रेष्ठ विजय संपादन करण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. यामध्ये शत्रूचे एकतरी मोहोरे पटावर ठेवून ‘प्यादेमात’ करण्याची पराकाष्ठा करावयाची असते. उदा., ‘हुचमल्ली’ म्हणजे विरोधी उंटाला पटावर राखून ठेवून केलेली प्यादेमात, ‘घोडमल्ली’ म्हणजे विरोधी घोड्याला राखून ठेवून केलेली प्यादेमात, ‘गजमल्ली’ म्हणजे विरोधी हत्तीला राखून ठेवून केलेली प्यादेमात, ‘राजहंसी’ किंवा ‘वजीरमल्ली’ म्हणजे विरोधी वजीराला राखून ठेवून केलेली प्यादेमात होय. अशा त-हेने उच्च प्रतीची मात करून श्रेष्ठ विजय संपादन करण्याच्या मोहात पडल्याने चतुरंगाच्या शास्त्रोक्त वाढीला खीळ बसत गेली आणि तो खेळ मागे पडला, तसेच त्यावर फारशी ग्रंथनिर्मितीही झाली नाही. साधारणपणे पंधराव्या शतकापासून यूरोपीय लोकांनी प्राचीन चतुरंगामध्ये विधायक दृष्टिकोनांतून रीतसर बदल केले. उदा., (१) वजीराला (क्वीन) महान शक्तिशाली सामर्थ्य दिले, (२) प्याद्याला (पहिल्या चालीत, हवे असल्यास) दोन घरे चालण्याची मुभा दिली, (३) प्याद्याची वाटमारी, (४) प्यादे-बढतीचे रुपांतर हवे असणाऱ्या मोहोऱ्यात करण्याची क्षमता, (५) शह नसताही राजा हलू शकणे, (६) राजाला (सुरक्षित किल्लेकोट करण्याची मुभा इ. नवीन सुविधाही डावात निर्माण केल्या. अशा नावीन्यपूर्ण विशेष गुणांमुळे या खेळात नवचैतन्य ओतले गेले. बुद्धिला आणि कल्पनाशक्तीला जोरदार चालना मिळाल्याने या खेळाला त्वरित लोकप्रियता लाभली. बुद्धिबळ खेळाची रीतसर जोपासना होऊन त्याला शास्त्रोक्त, नियमबद्ध स्वरूप देण्यात आले. खेळावर विपुल लिखाण होऊ लागले आणि बरीच ग्रंथनिर्मितीही झाली. आता ही पद्धती जगन्मान्य झाली आहे. हल्ली सर्वत्र प्रचलित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळच प्रमाणभूत मानला जातो. आ. १. डावाच्या सुरुवातीची पटस्थिती आ. १. डावाच्या सुरुवातीची पटस्थिती प्रचलित बुद्धिबळाचे स्वरूप : बुद्धिबळाचा खेळ दोन प्रतिस्पर्धी खेळाडू, बुद्धिबळाचा पट मध्ये ठेवून खेळतात. हा बुद्धिबळाचा पट, आलटून-पालटून पांढऱ्या आणि काळ्या रंगांच्या, समान आकारांच्या एकूण ६४ चौरसांचा (अथवा घरांचा) मिळून झालेला असतो. हा पट मध्ये ठेवताना पटाच्या कोपऱ्यातील पांढरे घर खेळाडूच्या उजव्या हाताला असावे लागते. पटावरील आठ, आठ घरे उभ्या पट्टीत (फाइल) असतात आणि पट्टीशी काटकोनात असणारी आठ घरे आडव्या रांकेत (रँक) असतात. समानरंगी व एकमेकांना कोपऱ्यात स्पर्श करणाऱ्या घरांना कर्ण (डायॅगोनल) म्हणतात. मोहोरी आणि प्यादी मिळून ज्या एकूण सोंगट्या होतात, त्यांना ‘बुद्धिबळे’ अशी संज्ञा आहे. आकृती क्र1 मध्ये दाखविल्याप्रमाणे डावाच्या सुरूवातीला एका खेळाडूकडे १६ पांढरी बुद्धिबळे आणि दुसऱ्या खेळाडूकडे १६ काळी बुद्धिबळे असतात. ‘स्टॉन्टन चेसमेन’या प्रकारची बुद्धिबळे अधिकृत मानली जातात. दोन खेळाडूंनी प्रत्येक वेळी एक याप्रमाणे आलटून-पालटून खेळी करावयाची असते. पांढरी बुद्धिबळे घेणारा खेळाडू डाव सुरू करतो. बुद्धिबळ खेळाच्या डावाची सुरुवातीची स्थिती आकृती क्र.१ मध्ये दाखविली आहे, त्यामध्ये सर्व बुद्धिबळांची संक्षिप्त नावेही दिली आहेत. खेळींची सर्वसाधारण माहिती : (१) खेळी म्हणजे एकच बुद्धिबळ एका घरातून रिकाम्या असलेल्या अथवा विरोधी बुद्धिबळाने व्यापलेल्या दुसऱ्या घरात नेणे. ह्यास किल्लेकोट (कॅसलिंग) या खेळीचा अपवाद आहे. किल्लेकोट या खेळीची माहिती पुढे राजाच्या खेळीवर्णनात दिली आहे. (२) घोडा आणि किल्लेकोट करतानाचा हत्ती यांशिवाय दुसरे कोणतेही बुद्धिबळ अन्य बुद्धिबळाने व्यापलेले घर ओलांडून जाऊ शकत नाही. (३) विरोधी बुद्धिबळाने व्यापलेल्या घरात हलविलेले बुद्धिबळ त्याच खेळीमध्ये विरोधी बुद्धिबळ मारते. हे मारलेले बुद्धिबळ पटावरून लगेच बाहेर काढणे, हे ते बुद्धिबळ मारणाऱ्या खेळाडूचे काम आहे. प्रत्येक प्रकारच्या बुद्धिबळाच्या खेळ्या : राजा : (किंग) किल्लेकोट करतानाचा अपवाद वगळता, राजा प्रतिपक्षीय बुद्धिबळाने नियंत्रित न केलेल्या कोणत्याही लगतच्या घरात हलतो. किल्लेकोट ही राजा व दोहोंपैकी एक हत्ती या दोघांची मिळून एकाच वेळी केली जाणारी राजाची एक खेळी होय. ती पुढीलप्रमाणे करतात : राजा त्याच्या मूळ घरातून त्याच रंगाच्या व त्याच रांकेत असलेल्या सर्वात जवळच्या घरात उजव्या किंवा डाव्या बाजूला हलतो; नंतर ज्याच्या दिशेने राजा हलविला आहे, तो हत्ती राजाच्या डोक्यावरून राजाने ओलांडलेल्या घरात ठेवला जातो. किल्लेकोट करणे काही परिस्थितीत प्रतिबंधित असते : (१) राजा पूर्वी हलविला असेल तर किल्लेकोट कधीच करता येत नाही; (२) किल्लेकोट ज्यायोगे करतात तो हत्ती पूर्वी हलविला असेल तर त्या हत्तीसमवेत किल्लेकोट करता येत नाही; (३) राजाचे मूळ घर किंवा राजाने ओलांडून जावयाचे घर अथवा राजाने किल्लेकोट केल्यानंतर शेवटी व्यापण्याचे घर जर प्रतिपक्षीय बुद्धिबळाने नियंत्रित केले असेल तर; (४) राजा आणि ज्या बाजूचा हत्ती हलणार तो हत्ती यांमध्ये कोणतेही बुद्धिबळ असेल, तर किल्लेकोट करणे तात्पुरते अशक्य होते. वजीर : (क्वीन). वजीर ज्या रांकेत, पट्टीत अथवा दोहोंपैकी कोणत्याही कर्णावर असेल; त्या रांकेतील, पट्टीतील अथवा कर्णावरील कोणत्याही घरात हलू शकतो. हत्ती : (रूक). हत्ती ज्या रांकेत आणि पट्टीत असतो, त्यावरील कोणत्याही घरात जाऊ शकतो. म्हणजेच उभ्या पट्टयांतून व आडव्या रांकातून फिरतो. उंट : (बिशप). उंट ज्या दोन कर्णावर असेल त्यावरील कोणत्याही घरात हलू शकतो. म्हणजे त्याची चाल तिरपी आहे. घोडा : (नाइट) घोड्याची खेळी ही दोन टप्प्यांची मिळून झालेली असते. प्रथम त्या घराच्या पट्टीवरील अथवा रांकेवरील लगतच्या घरात व तेथून नंतर या नव्या घराच्या कर्णावरील मूळ घरापासून दूरच्या शेजारील घरात घोडा जातो. ‘घोडा अडीच घरे चालतो’, असे या खेळीचे मराठीत वर्णन करतात. प्यादे : (पॉन). प्यादे फक्त पुढे सरकते. (अ) मारतानाचा अपवाद वगळता प्यादे त्याच्या डावाच्या स्वगृहातून म्हणजे प्रांरभीच्या मूळ जागेवरून त्या पट्टीतील एक किंवा दोन रिकामी घरे पुढे जाते. तदनंतरच्या खेळीत ते त्या पट्टीतील एक रिकामे घर पुढे जाते. मारताना ते त्या घराच्या कर्णावरील शेजारच्या दोहोंपैकी एका घरात पुढे जाते. (आ) प्यादे, त्याने नियंत्रित केलेले घर जर प्रतिपक्षीय प्याद्याने आधीच्या खेळीला दोन घरे पुढे येऊन ओलांडले असेल तर त्या प्याद्याला (जे दोन घरे पुढे जाते त्याला) ते जणू एकच घर हलले असल्याप्रमाणे मारते. मात्र अशा प्रकारे प्यादे मारावयाचे असल्यास ते लगेच पुढच्याच खेळीत मारावे लागते. याला ‘आं पासॉ’ (en passant) म्हणजे ‘वाटमारी’ असे म्हणतात. (इ) प्यादे एखाद्या पट्टीच्या शेवटी गेल्याबरोबर त्याच खेळीचा एक भाग म्हणून, त्याची खेळाडूच्या इच्छेनुसार वजीर, हत्ती, उंट, घोडा यांपैकी कोणत्याही एका मोहोऱ्याबद्दल ताबडतोब अदलाबदल करावी लागते. म्हणजेच प्याद्याचे स्वपक्षीय वजीर, हत्ती, घोडा अथवा उंट यांपैकी एकात रूपांतर होते. ह्या खेळीच्या वेळी पटावर असलेली इतर बुद्धिबळे विचारात घ्यावयाची नसतात. या प्रकारच्या रूपांतराला ‘बढती’ असे म्हणतात. या प्रकारच्या रूपांतरामुळे पटावर आलेले नवे मोहोरे प्याद्याच्याच रंगाचे असते व त्याद्वारा नियंत्रणही लगेच सुरू होते. उदा., बढतीमुळे पटावर आलेल्या बुद्धिबळाद्वारा त्याच बढतीच्या खेळीत प्रतिपक्षीय राजाला शह लागू शकतो. शह : (१)राजा ज्या घरात आहे ते घर प्रतिस्पर्ध्याच्या एखाद्या बुद्धिबळाने आक्रमित केले, तर त्या बुद्धिबळाने ‘राजाला शह दिला’ असे म्हणतात. (२) राजाला दिलेला शह पुढच्याच खेळीद्वारा काढावा लागतो.

जर कोणत्याही खेळीद्वारा शह काढता येत नसेल तर ‘मात’ होते. (३) जे बुद्धिबळ स्वतःच्या राजाला दिलेला शह छेदते, ते बुद्धिबळ त्याच खेळीत प्रतिपक्षीय राजाला शह देऊ शकते. जिंकलेला डाव : (१) जो खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या राजावर ‘मात’ करतो, तो खेळाडू डाव जिंकतो. (२) जो खेळाडू डाव सोडल्याचे जाहीर करतो, त्याच्या प्रतिस्पर्ध्याने तो डाव जिंकल्याचे गृहीत धरले जाते. बरोबरीचे डाव : डावात बरोबरी पुढील प्रकारे होतेः (१) ज्या खेळाडूची खेळी आहे, त्या खेळाडूचा राजा शहात नसून तो खेळाडू नियमानुसार कोणतीच खेळी करू शकत नसेल तर बरोबरी होते. या प्रकाराला ‘कुजी’ (स्टेलमेट) असे म्हणतात. (२) दोन्ही खेळाडूंच्या परस्परसंमतीनेही डाव बरोबरीत सोडवता येतो. (३) दोहोंपैकी एका खेळाडूच्या मागणीनुसार, जेव्हा समान पटस्थिती तीन वेळा आढळते व प्रत्येक वेळी त्याच खेळाडूची खेळी असते तेव्हा बरोबरी होते. जर त्याच रंगाच्या व प्रकारच्या सोंगट्यानी समान घरे व्यापली असतील तर ती पटस्थिती समान धरली जोते. अर्थात सर्व सोंगट्यांच्या शक्य असलेल्या खेळ्यांची संख्या तीच असली पाहिजे. अशा स्थितीत बरोबरीच्या डावाची मागणी करण्याचा हक्क फक्त अशाच खेळाडूला असतो, की (अ) ज्या खेळाडूला एखाद्या खेळीमुळे अशी पुनःपुन्हा उद्भवणारी परिस्थिती निर्माण करणे शक्य असते तो खेळाडू ती खेळी दर्शवून बरोबरीच्या डावासाठी ती खेळी करण्याआधी दावा करू शकतो. (आ) ज्या खेळीमुळे डावात पुनःपुन्हा तीच परिस्थिती उत्पन्न झालेली आहे, अशा खेळीला प्रत्युत्तर देणारा खेळाडू बरोबरीचा दावा करू शकतो, मात्र त्याने खेळी करण्यापूर्वी दावा केला पाहिजे. जर एखाद्या खेळाडूची वरील ‘अ’ उपविभागामध्ये केलेली मागणी बरोबर नसेल आणि डाव पुढे सूरू राहिला तर मात्र बरोबरीची मागणी करणाऱ्या खेळाडूला निर्देशित खेळीच करावी लागते. जर एखाद्या खेळाडूने बरोबरीच्या डावासाठी (अ) आणि (आ) यांत सांगितल्याप्रमाणे दावा न करता खेळी केली, तर त्याचा बरोबरी मागण्याचा हक्क नष्ट होतो. परंतु पुन्हा त्या खेळाडूची खेळी तशाच परिस्थितीत आल्यास व शक्य असलेल्या एकूण खेळ्यांची संख्या कायम राहिल्यास बरोबरीचा दावा करण्याचा त्याचा हक्क अबाधित राहतो. (४) ज्या खेळाडूची खेळण्याची पाळी आहे, त्या खेळाडूने जर असे सिद्ध केले की, दोन्ही खेळाडूंनी कमीत कमी पन्नास खेळ्या मारामारी न करता व एकही प्याद्याची खेळी न करता केल्या आहेत तर बरोबरी होते. पन्नास खेळ्यांची ही संख्या पटावरील काही विशिष्ट परिस्थितीच्या बाबतीत वाढविली जाऊ शकते. मात्र अशा वेळी वाढविलेली संख्या आणि ती विशिष्ट परिस्थिती डाव सुरू होण्याआधी निश्चित केली असली पाहिजे. खेळी-लेखन: ह्याच्य दोन प्रचलित पद्धती असून त्यांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे. वर्णनात्मक पद्धत: आकृती क्र.१ मध्ये पांढऱ्या वजीरासमोर काळा वजीर ‘व’ पट्टीत आहे, त्याचप्रमाणे पांढऱ्या राजासमोर काळा राजा‘रा’ पट्टीत आहे. अशा प्रकारे ‘व ह’, ‘व घो’, ‘व उं’, ‘व’ आणि ‘रा’, ‘रा उं’, ‘रा घो’, ‘रा ह’ अशी पट्टींची नावे होतात. आकृती क्र.१ मध्ये पांढऱ्याच्या बाजूकडून पहिल्या रांकेत पांढऱ्या मोहोऱ्यांची स्वगृहे आहेत, त्या पहिल्या रांकेतील घरांना अनुक्रमांक ‘१’ देतात आणि पांढऱ्या प्याद्यांची स्वगृहे दुसऱ्या रांकेत येतात, त्यांना अनुक्रमांक ‘२’ देतात. अशा रीतीने घरांचे अनुक्रमांक पांढऱ्याच्या बाजूकडून काळ्याच्या बाजूकडे चढत (आठपर्यंत) जातात. या उलट काळ्याच्या बाजूकडून काळ्या मोहोऱ्यांची स्वगृहे पहिल्या रांकेत येतात, त्या घरांना अनु.क्र.‘१’ काळ्या प्याद्यांची स्वगृहे दुसऱ्या रांकेत येतात, त्या घरांना ‘२’ अशा रीतीने घरांचे अनुक्रमांक काळ्याच्या बाजूकडून पांढऱ्याच्या बाजूकडे चढत (आठपर्यंत) जातात. तेव्हा वर्णनात्मक पद्धतीत प्रत्येक घराला दोन नावे असतात. पांढऱ्याचे ‘रा ह १’ हे घर, काळ्याचे ‘रा ह ८’ असते, वगैरे. बैजिक पद्धत : या पद्धतीत ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’, एफ्’, ‘जी’, ‘एच्’, अशी उभ्या पट्टींची नावे असतात. आडव्या रांकेतील घरांचे क्रमांक १,२,३,४,५,६,७,८ असे पांढऱ्याच्या बाजूकडून काळ्याच्या बाजूकडे चढत जातात. या पद्धतीत प्रत्येक घराला एकच नाव असते. उदा., पटमध्यातील लांब कर्णावर ‘ए१‘, ‘बी२’, ‘सी३’, ‘डी४’, ‘ई५’,‘एफ्६’, ‘जी७’, ‘एच्८’ तसेच दुसऱ्या लांब कर्णावर ‘एच्१’, ‘जी२’,.........‘ए८’ अशी घरांची नावे असतात. बैजिक पद्धतीमध्ये प्याद्याची खेळी लिहिताना 'प्या' हे संक्षिप्त अक्षर गाळतात. दोन्ही पद्धतींमध्ये खेळी लिहिताना पुढे दाखविल्याप्रमाणे चिन्हे वापरतात: ०-० राजाच्या बाजूचा किल्लेकोट. ०-०-० वजीराच्या बाजूचा किल्लेकोट. -कडे हलविले, ‘:’ किंवा ‘×’ ला मारले. वा.मा. -वाटमारीने प्यादे मारले आहे. वर्णनात्मक पद्धतीत ‘शह’ आणि ‘मात’ असे स्पष्ट लिहितात. दु. शह- दुहेरी शह, काटशह. बैजिक पद्धतीत शहसाठी + हे चिन्ह, दुहेरी शहसाठी ++ हे चिन्ह आणि मातसाठी ++ किंवा ++ ही चिन्हे वापरतात. आ. २.

डावसमाप्तीची, मात होतानाची पटस्थिती. आ. २. डावसमाप्तीची, मात होतानाची पटस्थिती. बुद्धिबळाचे खेळीलेखन करताना जे बुद्धिबळ हलविले आहे, त्याचे संक्षिप्त नाव प्रथम लिहून ते बुद्धिबळ ज्या घरात हलविले आहे, त्या घराचे नाव वरील पद्धतीत सांगितल्याप्रमाणे लिहितात. आकृती क्र. १ मध्ये दाखविलेल्या स्थितीतून पुढीलप्रमाणे सुरुवातीच्या चाली केल्या आहेत: (१) पांढऱ्याने त्याच्या राजापुढील प्यादे दोन घरे पुढे चालविले आहे; काळाही तशीच उत्तरदायी चाल करतो. (२) पांढरा त्याचा ‘रा’ घोडा ‘रा उं; प्याद्यापुढील घरात चालवतो, तेव्हा काळा त्याचे ‘व’ प्यादे एक घर पुढे सारतो आणि पुढे पांढऱ्याच्या १३ चाली, तर काळ्याच्या १२ चाली होऊन त्याच्यावर मात होते. या संपूर्ण डावाचे खेळीलेखन दोन्ही पद्धतींमध्ये पुढे दिले आहे : वर्णनात्मक पद्धत खेळी क्र १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ पांढरी प्या-रा ४ घो-राउं ३ उं-उं ४ घो-उं ३ प्या-व४ व × प्या उं × प्या शह घो-घो ५ शह व-उं ४ शह घो × वप्या घो × घो दु. शह घो(घो ५) × प्या शह ह × घो व - घो ८ मात काळी प्या-रा ४ प्या-व ३ घो-राउं३ वघो-व २ प्या × प्या उं-रा २ रा × उं रा-घो १ प्या-व ४ घो-रा ४ रा-उं १ बैजिक पद्धत पांढरी ई ४ घो-एफ ३ उं-सी ४ घो-सी ३ डी ४ व : डी ४ काळी ई ५ डी ६ घो-एफ ६ घो(बी)- डी ७ ई ५ : डी ४ उं-ई ७ उं : एफ् ७ + रा : एफ् ७ घो -जी ५ + रा - ८ व-सी ४ + डी ५ घो : डी ५ घो-ई ५ घो : एफ् ६ ++ रा - एफ् ८ घो (जी) : एच् ७ ह : एच् ७ व - जी ८ ++ या चालीनंतर येणारी स्थिती आ. २ मध्ये दर्शवली आहे. बुद्धिबळ -घड्याळ बुद्धिबळ -घड्याळ बुद्धिबळ-घड्याळ: (चेस क्लॉक). बुद्धिबळाचा डाव खेळत असताना प्रत्येक खेळाडूची प्रत्यक्ष खेळ-वेळा नोंदविणारे ‘बुद्धिबळ-घड्याळ’ बे एक साधन आहे. हे एका खोक्यामध्ये दोन घड्याळांनी युक्त असे असते आणि प्रत्येक घड्याळावर एकेक कळ म्हणजे बटण असते. खेळाडू त्याची खेळी खेळतो आणि त्याच्या घड्याळावरील बटण दाबतो, तेव्हा त्याचे घड्याळ बंद पडते, व त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या घड्याळावरील बटण वर जाऊन त्याचे घड्याळ सुरू होते. ह्यावरून दिसून येईल की, ज्या खेळाडूंची खेळी करण्याची पाळी असते, तेव्हाच फक्त त्या खेळाडूचे घड्याळ चालू राहते आणि त्या खेळाडूच्या एकूण चाली-प्रणालींची संचित (जमा झालेली) खेळवेळ मोजता येते. जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (एफ्. आय्. डी. ई. ) नियमानुसार अधिकृत बुद्धिबळ सामन्यातील खेळबैठक (सेशन) पाच तासांची आहे आणि न संपलेले स्थगित डाव दुसऱ्या दिवशी पुढे खेळतात. सामन्याच्या पाच तासांच्या प्रमाणवेळेत दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी कमीत कमी ४०-४० चाली करणे आवश्यक असते. तेव्हा प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी अडीच तासात चाळीस चाली करणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धिबळ-घड्याळ वापरतात. चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे प्रत्येक घड्याळात एकेक छोटेसे लाल निशाण असते. जेव्हा खेळबैठकीची घटका भरते, तेव्हा मिनिट-काटा हे निशाण ढकलून उचलतो आणि जेव्हा मिनिट-काटा ठरीव घटका ओलांडतो, तेव्हा हे निशाण खाली पडते आणि त्या खेळाडूची खेळ-वेळ संपल्याचे दर्शविते. समजा, घड्याळे ३-३० वाजता सुरू केली आहेत आणि ६-०० वाजण्याच्या घटकेला जेव्हा ते निशाण खाली पडते, तेव्हा जो खेळाडू आपल्या ४० चाली करू शकला नाही तो खेळाडू डाव हरतो. या साधनाचा शोध मँचेस्टरच्या टॉमस ब्राइट विल्सन यांनी प्रथम लावला. १८८३ साली ते लंडन येथे प्रथम उपयोगात आणले गेले. भारतातील आधुनिक बुद्धिबळाचा आढावा : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळ भारतात ब्रिटिश अंमलाबरोबरच प्रचारात आला. १८२८-२९ मध्ये मद्रासच्या गुलाम कासीम विरुद्ध जेम्स कॉक्रन यांच्यामध्ये पत्रोपत्री बुद्धिबळाचा डाव झाला होता. गुलाम कासीमच्या एका खेळीचा ‘राजाच्या आमिषाचा (किंग्ज गँबिट) हल्ला’ असा उल्लेख मॉडर्न चेस ओपनिंगच्या आठव्या आवृत्तीमध्ये आढळतो, यावरून हे स्पष्ट होते. भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा सर्वप्रथम ‘जॉली क्लब’ ने पुणे येथे १९२१ मध्ये आयोजित केली होती. त्याच क्लबतर्फे ‘रानडे ट्रस्ट’ बुद्धिबळ सामने नियमित भरवले जातात. १९२४ च्या सुमारास पतियाळाच्या महाराजांनी द्रव्यसाहाय्य देऊन छाली येथे अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये मिरजेच्या नारायणराव जोशींनी युगोस्लाव्हियाचा बुद्धिबळपटू बोरीस कॉस्टीक याच्यावर आघाडी मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. भारतामध्ये या खेळाचे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण करणारी ‘ऑल इंडिया चेस फेडरेशन’ ही संस्था १९५० च्या सुमारास स्थापन झाली. जागतिक बुद्धिबळ महासंघाशी (एफ्. आय्. डी. ई.) ती संलग्न आहे. या राष्ट्रीय संस्थेची सोळा राज्य-बुद्धिबळ-मंडळे सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेची स्थापना १ एप्रिल १९६७ मध्ये झाली. या संघटनेचे (१) मुंबई, (२) दक्षिण, (३) मध्य, (४)विदर्भ व (५) मराठवाडा असे पाच विभाग पाडण्यात आले आहेत.

राष्ट्रीय सामन्यासाठी खेळाडूंची निवड ही राज्यसंस्था करते. राष्ट्रीय ‘अ’ व ब’ बुद्धिबळ स्पर्धा ए. आय्. सी. एफ्. दरवर्षी आयोजित करते. ‘अ’ स्पर्धेत गतवर्षीचे राष्ट्रीय ‘अ’ चे पहिले सहा बुद्धिबळपटू आणि राष्ट्रीय ‘ब’ स्पर्धेतून आलेले पहिले १४ बुद्धिबळपटू भाग घेण्यास योग्य ठरतात. ही स्पर्धा ‘राउंड रॉबिन’ म्हणजे साखळी पद्धतीने खेळली जाते. या स्पर्धेत अग्रक्रमांक मिळविणाऱ्या बुद्धिबळपटूंचा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी, म्हणजे विभागीय (झोनल), आंतरविभागीय (इंटर झोनल), ऑलिंपियाड स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी विचार केला जातो. राष्ट्रीय अजिंक्यवीर ठरलेल्या बुद्धिबळपटूंत पुढील खेळाडूंचा समावेश होतो; रामचंद्र सप्रे व डी. व्यंकय्या (१९५५), रामदास गुप्ता(१९५७), मॅन्युअल एरन (१९५९, १९६१, १९६९, १९७१, १९७३, १९७४, १९७६, व १९८०), फरूक अली (१९६३), रूसी मदन (१९६५), नसीर अली (१९६७), राजा रविशेखर (१९७५ व १९७९), रफीक खान (१९७७) आणि प्रविण ठिपसे (१९८१),महिला गटातील अजिंक्यपद मिळविणाऱ्या बुद्धिबळपटूंत वासंती, जयश्री व रोहिणी (१९८१ व त्याआधी तीन वेळा) या खाडिलकर भगिनींचा उल्लेख आवश्यक आहे. राष्ट्रीय कुमारगट व बालगट यांच्यातही अजिंक्यपदाच्या स्पर्धा घेतल्या जातात. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वप्रथम भारताची शान वाढविणारा बुद्धिबळपटू म्हणजे मीर सुलतान खान (१९०५-६६) होय. सुरुवातीला प्राचीन चतुरंगात प्राविण्य मिळविणाऱ्या ह्या निरक्षर बुद्धिबळपटूने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळ आत्मसात करून अनेक नेत्रदीपक विजय मिळविले : त्याने ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धा दोन वेळा (१९२९ व १९३३) जिंकली; तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चौथा व आंतरराष्ट्रीय साखळी स्पर्धांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला (१९३०). त्याच सुमारास हेस्टिंग्जच्या ख्रिसमस काँग्रेसमध्ये ग्रँड मास्टर कापाब्लांकाला हरवून तिसरा क्रमांक पटकावला. यानंतर साधारणपणे २८ वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय बुद्धिबळपटू पुन्हा विक्रम गाजवू लागले: मॅन्युअल एरन याने आशिया ऑस्ट्रेलिया विभागीय अंतिम स्पर्धेत (१९६१-६२) ‘इंटरनॅशनल मास्टर’ हा किताब मिळवला. तसेच व्ही. रविकुमार याने आशियाई कुमार स्पर्धेत (१९७८) बारापैकी आठ गुण मिळवून ‘इंटरनॅशनल मास्टर’ हा किताब मिळवला. याखेरीज ‘आशियाई मास्टर चेस सर्किट’ स्पर्धेत टी. एन्. परमेश्वरन, राजा रविशेखर, प्रवीण ठिपसे, कुमार दिव्येंदू बारुआ इत्यादींनी स्पृहणीय यश मिळवले. जयश्री आंतरराष्ट्रीय कीर्तीची बुद्धिबळपटू रोहिणी खाडिलकर आंतरराष्ट्रीय कीर्तीची बुद्धिबळपटू रोहिणी खाडिलकर खाडिलकरने आशियाई विभागीय महिला स्पर्धेत (१९७८) अजिंक्य पद व आंतरराष्ट्रीय ‘वुमन मास्टर’ हा किताब मिळवला. रोहिणी खाडिलकरने पहिल्या ‘ॲक्युमॅक्स’ आशियाई महिला स्पर्धेत अजिंक्य पद मिळवले. ‘आशियाची राणी’ हे बिरूद व ‘इंदिरा गांधी’ फिरती ढाल हे गौरव तिला प्राप्त झाले. एम्. हुसेन आंतरराष्ट्रीय प्रतवारी स्पर्धेत (१९८०) राजा रविशेखरने अजिंक्यपद मिळवले. शतकातील सर्वोत्कृष्ट डाव : (गेम ऑफ द सेंच्यूरी). हे नाव हेन्स कमोच यांनी १९५६ साली रोझेन्वाल्ड येथील स्पर्धेत, बॉबी फिशरने वयाच्या तेराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ‘मास्टर’ डॉनल्ड बर्न याच्या विरूद्ध जिंकलेल्या डावाला दिले आहे. फिशरने मात-घातक डावसमाप्तीसाठी आपला वजीर आणि हत्ती देऊन तो डाव जिंकला होता. या स्पर्धेत तो आठवा आला होता. जागतिक बुद्धिबळ महासंघ : ‘फेडरेशन इंटरनॅशनल डी इ चेस’ (एफ्. आय्. डी.ई. -फीडे) या संस्थेची स्थापना २० जुलै १९२४ मध्ये पॅरिस येथे झाली. सु.११० देश या महासंघाचे सभासद आहेत. 

फीडेतर्फे पुढीलप्रमाणे जागतिक बुद्धिबळ सामने आयोजित केले जातात :

 (१) दर वर्षाआड ऑलिंपियाड सामने, 

(२) दर तीन वर्षांनी विभागीय (झोनल), आंतरविभागीय (इंटरझोनल), आव्हानवीर निवड (कँडिडेट) सामने व जागतिक अजिंक्यपद सामने. असेच सर्व सामने महिलांसाठीही आयोजित केले जातात. 

(३) जागतिक युवक किंवा कनिष्ठ अजिंक्यपद सामने, 

(४) १७ वर्षांखालील जागतिक कुमारगट सामने, 

(५) जागतिक २५ वर्षाखालील युवक संघ अजिंक्यपद सामने. ‘फीडे’ पुढीलप्रमाणे स्त्री-पुरुष खेळाडूंना बुद्धिबळातील उच्च पदव्या बहाल करते: ग्रँड मास्टर, इंटरनॅशनल मास्टर, फीडे मास्टर, इंटरनॅशनल जज्ज. एलो गुणवत्ता-मापन पद्धती: बुद्धिबळपटूंचे सामर्थ्य तुलनात्मक दृष्ट्या अजमावण्याची ही पद्धत आहे. ही पद्धत त्या त्या खेळाडूंच्या गतस्पर्धातील निकालांवर आधारलेली आहे. ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या बलावर तसेच त्यांच्याविरुद्ध त्यांनी एकूण जिंकलेल्या, हरलेल्या व बरोबरीच्या डावांच्या गुणांचे गणिती पृथक्करण करून एलो गुणवत्ता श्रेणी दिली जाते. ही पद्धत आर्पद एलो यांच्या नावाने ओळखली जाते. फीडे दर वर्षी १ जानेवारीला आंतरराष्ट्रीय गुणवर्गवारी यादी (रेटींग लिस्ट) प्रसिद्ध करते.

No comments:

Post a Comment