LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


बोधकथा 31 ते 40

 कथा क्रमांक - 31 

देव आणि साप

लोक आपल्याला विनाकारण त्रास देतात व छळतात अशी एक सापाने देवाजवळ तक्रार केली. ती ऐकून देव त्याला म्हणाला, 'अरे, ही तुझीच चूक. ज्याने तुला त्रास दिला त्याला तू कडकडून चावला असतास तर इतर लोक तुझ्या वाटेला गेले नसते.'

तात्पर्य

- आपल्याला त्रास देणार्‍या एका माणसाला क्षमा केली तर दुसरी माणसंही आपल्याला त्रास देतात. यासाठी पहिल्यापासून सावध रहावे.


--------------------------

 कथा क्रमांक - 32 

अस्वल आणि मधमाशा

एका बागेत एक मधमाश्यांचे पोळे होते. त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध पिणार, तोच सगळ्या मधमाशा त्याच्यावर तुटून पडल्या व त्याच्या नाकातोंडावर चावून त्याला अगदी सतावून सोडले. त्यामुळे ते अस्वल इतके वेडावल्यासारखे झाले की रागाच्या भरात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजाने फाडून टाकली.

तात्पर्य

- प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला की त्या भरात तो स्वतःलाही इजा करून घेण्यास कमी करत नाही


--------------------------

 कथा क्रमांक - 33 

आजारी सांबर

एक सांबर आजारी पडले असता चरायच्या कुरणात कोपर्‍यात स्वस्थ पडून राहिले. त्या कुरणात चरणारे त्याचे मित्र व इतर प्राणी त्याला भेटायला येत. त्यापैकी प्रत्येक प्राणी त्याच्या पुढे ठेवलेल्या गवतापैकी काही गवत खाऊन जात असत. असे होता होता, ते गरीब बिचारे सांबर मरण पावले. पण ते आजारपणाने मरण न पावता त्याला भेटायला येणार्‍या प्राण्यांनी त्याच्यापुढील सगळे गवत खाऊन टाकल्याने उपासमारीमुळे मेले.

तात्पर्य

- दुष्ट मित्र हितापेक्षा अहितच जास्त करतात.


--------------------------

 कथा क्रमांक - 34

आळशी तरुण माणूस

एका आळशी तरुण माणसाला सकाळी दहा वाजेपर्यंत बिछान्यात पडून राहण्याची सवय होती. त्याला एकाने विचारले, 'अरे, तू सकाळी लवकर का उठत नाहीस?' तरुण म्हणाला, 'प्रत्येक दिवशी सकाळी मी पाहतो, तो निरोद्योगिता व उद्योगिता या नावाच्या दोन स्त्रिया माझ्या दोन बाजूला उभ्या असतात. उद्योगिता मला म्हणते, 'उठ अन् कामाला लाग. निरोद्योगिता म्हणते, 'उठू नकोस, असाच पडून रहा.' इतकंच न सांगता त्या आपली मतं समजावून देण्यासाठी लांब लांब भाषण करतात आणि निरनिराळी कारण सांगतात. त्या दोघींची भाषण एखाद्या न्यायाधीशासारखी मी ऐकून घेतो, तोच जेवणाची वेळ होते. मग त्या वेळी मी उठतो !'

तात्पर्य

- आळशी माणूस काम करायला लागू नये म्हणून वाटेल त्या सबबी सांगतो.

--------------------------

 कथा क्रमांक - 35

वकील आणि सरदार

एका राजाने आपला वकील दुसर्‍या राजाच्या दरबारी पाठविला. तो तेथे जाऊन पोहोचल्यावर तेथील राजाने नोकर-चाकर पाठवून वाजंत्री वाजवत मोठ्या सन्मानाने शहरात नेण्यास सुरुवाते केली. तो वकील कंजूष असल्याने वाजंत्री व मिरवणूक यात पैसा विनाकारण खर्च व्हावा हे त्याला पटले नाही. म्हणून तो त्यांना म्हणाला, 'अरे, माझी आई वारली, तिच्या सुतकात मी असल्यामुळे हा सगळा थाटमाट तुम्ही बंद कराल तर बरं होईल.' ते ऐकताच लोकांनी आपली वाद्य बंद केली. पुढे ही हकीगत तेथील एका सरदाराला समजली. तेव्हा तो त्या वकीलाजवळ येऊन त्याला म्हणाला, 'वकीलसाहेब आपल्या आईच्या मृत्युची बातमी ऐकून मला फार वाईट वाटलं, आपली आई वारली, त्याला आज किती दिवस झाले बर ?' वकील उत्तरला, 'त्या गोष्टीला आज चांगली चाळीस वर्षे झाली असतील'

तात्पर्य

- पैसा वाचविण्यासाठी कंजूष माणूस वाटेल ती सबब सांगायला कमी करत नाही.


--------------------------

 कथा क्रमांक - 36

वाकडे झाड

एका अरण्यात इमारतीला उपयोगी पडणार्‍या झाडांची लागवड केली होती. ती सगळी झाडे अगदी उंच व सरळ वाढली होती. त्यातील फक्त एकच झाड वाकडे होते व ते इमारतीला उपयोगी पडणारे नव्हते. त्याच्याकडे पाहून इतर झाडे मोठ्याने हसून वेडेवाकडेपणाबद्दल त्याची चेष्टा करत. त्या अरण्याच्या मालकाने एकदा नवीन घर बांधण्याचे ठरविले व त्यासाठी लाकडाचा उपयोग होइल अशी सगळी झाडे तोडण्याचा हुकूम नोकरांना दिला. त्याप्रमाणे नोकराने ते वाकडे झाड सोडून सगळी झाडे तोडून टाकली.

तात्पर्य

- ज्या गुणामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तो गुण अंगी नसला तर त्याबद्दल वाईट वाटू नये.


--------------------------

 कथा क्रमांक - 37

उंदराचे सिंहाशी लग्न

उंदरामुळे जाळ्यातून सुटलेला सिंह खूष होऊन त्या उंदराला म्हणाला, 'अरे, तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.' ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, 'महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहिजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भिती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी.' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्याला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली. ती तरुण मुलगी मोठ्या डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला.

तात्पर्य

- जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे, नाहीतर भलतेच मागणे मागितल्यामुळे संकट निर्माण होईल.


--------------------------

 कथा क्रमांक - 38

सिंह  आणि उंदीर

उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने एका उंदरास पंजात पकडले व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, 'महाराज, आपण मोठे, सर्व प्राण्यांचे राजे, मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.' ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता त्याच झाडाजवळ शिकार्‍याने जाळे लावले होते, त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खर्चून धडपड केली, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठ्याने ओरडू लागला. तो आवाज ऐकून तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला, 'राजा भिऊ नकोस, स्वस्थ बस.' इतके बोलून त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.

तात्पर्य

- मोठ्याचे एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कोणाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात माणसाने लोकावर उपकार केलेत तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात.


--------------------------

 कथा क्रमांक - 39

शेतकरी आणि नदी

एका शेतकर्‍याला नदी पार करून जायचे होते, म्हणून पाण्याला उतार कोठे आहे हे पाहण्यासाठी तो नदीच्या काठावर खालीवर फिरू लागला. थोड्या वेळाने तो म्हणाला, 'जिथे पाणी संथ वाहतं तिथे ते फार खोल आहे व जिथे पाण्याचा फार आवाज ऐकू येतो तिथे ते अगदी उथळ आहे.'

तात्पर्य

- शांत वाटणारा अगदी आतल्या गाठीचा असल्याने त्याच्याकडून धोका असण्याचा जसा संभव असतो तसा बडबड्या आणि मोकळ्या मनाच्या माणसाकडून नसतो.


--------------------------

 कथा क्रमांक - ४0

स्वयंपाकी  व मासा

एका मुसलमानाच्या घरचा स्वैपाकी एकदा एक जिवंत मासा तेलात तळत असता, त्या उष्णतेने त्या माशाला इतक्या वेदना होऊ लागल्या की ते टाळण्यासाठी त्याने चुलीत उडी मारली. पण त्यामुळे त्याची अशी स्थिति झाली की पूर्वीची बरी होती, असे त्याला वाटू लागले.

तात्पर्य

- कधीतरी एखादे औषध प्रकृतीला इतके अपायकारण होते की त्यापेक्षा मूळचा रोग बरा असे म्हणण्याची पाळी येते.


--------------------------

No comments:

Post a Comment