LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


गोल्फ

 गोल्फ

----------------------------------

चेंडू व काठी या साधनांनी १८ खळग्यांचा मार्ग व्यापणाऱ्या मोठ्या मैदानावर खेळावयाचा एक विदेशी खेळ. गोल्फचा रबरी चेंडू कागदी लिंबाएवढ्या आकाराचा असतो. गोल्फच्या काठ्या ३ ते ४ फूट (सु. १ मी.) लांबीच्या असून त्या १४ प्रकारच्या असतात. त्यांना उपयुक्ततेप्रमाणे टोल्या (ड्रायव्हर), चमचा ( स्पूनर), ढकली (पंटर), लोखंडी (आयर्न) इ. नावे आहेत. गोल्फचे मैदान क्रिकेट, फुटबॉल या खेळांच्या मैदानाप्रमाणे ठराविक लांबीरुंदीचे व सपाट नसते. ओढे, नाले, चढउतार, झाडेझुडुपे असे नैसर्गिक अडथळे असलेल्या विस्तृत प्रदेशावर १८ खळगे विखुरलेले असतात. ते एका मागोमाग एक घेत खेळाडूस सु. ३ ते ४ मैल (सु. ४ ते ६ किमी.) अंतर क्रमाने कापावे लागते.


मैदानावरील खळगे ४ १/४ इंच (१०·६३ सेंमी.) व्यासाचे व ४ इंच (१०·१६ सेंमी.) खोलीचे असतात. ठराविक अंतरावरून काठीने चेंडूस टोला मारून तो खळग्याकडे टोलवावयाचा असतो. टोला मारावयाच्या जागेपासून प्रत्येक खळगा सु. १०० ते ५०० यार्ड (९१·४४ मी. ते ४५७·२० मी.) यांच्या दरम्यान असतो. अशा १८ खळग्यांपैकी ४ खळगे कमी अंतराचे असतात. कमीत कमी टोले मारून १८ खळग्यांची मालिका जो खेळाडू प्रथम पूर्ण करील, तो विजयी ठरतो. टेनिसप्रमाणे या खेळात एकेरी व दुहेरी असे सामने होतात. प्रत्येक खेळाडूच्या मदतीसाठी गोल्फच्या काठ्यांची पिशवी घेऊन हिंडणारा एका नोकर असतो. या खेळातही हौशी आणि धंदेवाईक खेळाडू हे प्रकार आहेत.


आधुनिक गोल्फचा खेळ प्रथम स्कॉटलंडमध्ये सुरू झाला. पूर्वी रोमन लोक अशाच प्रकारचा एक खेळ खेळत. त्यांच्याबरोबर तो खेळ पश्चिम यूरोपातील देशांत आला असावा आणि त्यातूनच गोल्फचा उगम झाला असावा. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात या खेळाला मूर्त स्वरूप आले. या खेळात आता सुसूत्रता आली असून त्याचे हौशी व धंदेवाईक खेळाडूंसाठी स्वतंत्रपणे सामने भरतात.


या खेळाचे रायडर चषक, वॉकर चषक, अमेरिकन ओपन चँपियनशिप यांसारखे जागतिक महत्त्वाचे सामने दरसाल भरतात. हॅरी व्हार्डन हा छत्तीस वेळा सर्वविजेता होता. बॉबी जोन्स याला सर्वोत्तम हौशी खेळाडू मानतात. वॉल्टर हेगेन, हेन्री कॉटन, गॅरी प्लेयर हे पुरुषखेळाडू आणि श्रीमती व्हेयर व श्रीमती झॅहरियस डीड्रिक्सन या स्त्रीखेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत.भारतात दिल्ली, कलकत्ता इ. ठिकाणी या खेळाची मैदाने आहेत. हा खेळ फार खर्चाचा आणि वेळ घेणारा आहे. भारतात तो विशेष लोकप्रिय नाही.

------------------------------------

No comments:

Post a Comment