LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


बोधकथा 1 ते 10



कथा क्रमांक - 1 

कोल्हा, रानमांजर आणि ससा

एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.

मरता मरता ससा म्हणाला, 'तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.'

तात्पर्य

एकमेकांशी सतत भांडणार्‍या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो. 

-----------------------

कथा क्रमांक - 2

सिंह  लांडगा आणि कोल्हा

एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?'

तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'

सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.

तात्पर्य

 दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.

-----------------------

कथा क्रमांक - 3

धनगर आणि लांडग्याचे पिलू

एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले. धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते. परंतु, ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच एखाद्या चुकार मेंढराला बाजूला नेऊन, मारून खात असे. बर्‍याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्यास झाडाला टांगून मारून टाकले.

तात्पर्य

 प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही.

-----------------------

कथा क्रमांक - 4

डोमकावळा आणि साप

एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार, तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला. तेव्हा तो डोमकावळा म्हणाला, 'दुसर्‍यांना मारून स्वतःची भूक शांत करणार्‍याला हीच शिक्षा योग्य आहे.'

तात्पर्य

- जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळविण्याचा प्रयत्‍न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे होय.

-----------------------

कथा क्रमांक - 5

दुर्दैवी जोडपे

एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवर्‍याशी भांडत असे. एकदा ती माहेरी गेली होती. तेथून परत आल्यावर नवर्‍याने तिला विचारले. 'तू तिथे मजेत होतीस ना ?

तेव्हा बायको म्हणाली, 'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही. तिथली गडीमाणसं सुद्धा मला कंटाळली होती, असं त्याच्या चेहेर्‍यावरून वाटत होतं !'

त्यावर तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणार्‍या गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन ?'

तात्पर्य

आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे.

-----------------------

कथा क्रमांक - 6

कावळा आणि कुत्रा

एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. कुत्रा म्हणाला, 'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.'

यावर कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे. तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.'

तात्पर्य

 देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्‍या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच.

-----------------------

कथा क्रमांक - 7

कोल्हा आणि खेकडा

समुद्रातील एक खेकडा एकदा सहज समुद्रकिनार्‍यावर आला. तेवढ्यात एका कोल्हाने त्याला पकडले आणि तो खेकड्याला मारून खाऊ लागला. तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला, 'मीच मूर्ख ! आरामात समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर यायची उठाउठेव कोणी सांगितली होती ? नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे !'

तात्पर्य

 ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो.

-----------------------

कथा क्रमांक - 8

सिंह आणि उंदीर

उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला. त्यामुळे जागा होऊन त्याने एका उंदरास पंजात पकडले व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, 'महाराज, आपण मोठे, सर्व प्राण्यांचे राजे, मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.' ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता त्याच झाडाजवळ शिकार्‍याने जाळे लावले होते, त्यात सापडला. त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खर्चून धडपड केली, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठ्याने ओरडू लागला. तो आवाज ऐकून तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला, 'राजा भिऊ नकोस, स्वस्थ बस.' इतके बोलून त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.

तात्पर्य

 मोठ्याचे एखादे मोठे काम लहानाच्या हातून एखादे वेळी होते. यासाठी कोणाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात माणसाने लोकावर उपकार केलेत तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात.

-----------------------

कथा क्रमांक - 9

शहाणा गाढव

एक म्हातारा आपले गाढव चारीत असतां त्याचा शत्रू त्या ठिकाणी आला. तेव्हा तो म्हातारा आपल्या गाढवाला म्हणाला, 'मित्रा, चल आपण पळून जाऊ.' त्यावर ते गाढव म्हणाले, 'अरे, तुझा तो शत्रू माझ्या पाठीवर काठी का घालत नाही?' म्हातारा म्हणाला, 'अरे, तोही तुझ्या पाठीवर काठी घालील, यात काही संशय आहे का?' गाढव म्हणाले, 'असं जर असेल तर मी इथून बिलकूल हालणार नाही. माझ्या नशीबातली काठी चुकत नसेल तर माझा मालक कोणी का असेना?'

तात्पर्य

 आपल्या स्थितीत जर काही फरक पडत नसेल तर कोणाचीही चाकरी करायला हरकत नाही.

-----------------------

कथा क्रमांक - 10

सागवान वृक्ष आणि काटेझाड

एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्‍हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.'

तात्पर्य

 मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणामागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.

-----------------------


No comments:

Post a Comment