बोधकथा क्रमांक 51
बोका आणि कोल्हा
एका अरण्यातील झाडाखाली एक बोका व एक कोल्हा बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, 'अरे बोकोबा, कदाचित आपल्यावर जर एखादं संकट आलं तर हजार युक्त्या करून मी त्यातून निभावून जाईन पण तुझं कसं होईल याची मला काळजी वाटते.'
बोका म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एकच युक्ती माहीत आहे. तेवढी चुकली तर मात्र माझी काही धडगत नाही. कोल्हा म्हणाला, 'बाबा रे, तुझी मला फारच काळजी वाटते. अरे, एक दोन युक्त्या मी शिकवल्या असत्या पण आजचा काळ असा आहे की ज्यानं त्यानं आपल्या स्वतःपुरतं पहावं. दुसर्याच्या उठाठेवी करू नयेत. बरं तर येतो मी. रामराम !' इतके बोलून कोल्हा निघाला तोच मागून शिकार्याची कुत्री धावत आली. बोक्याला झाडावर चढता येत असल्याने तो पटकन् झाडावर चढला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून थोडसा पुढे पळत नाही तोच शिकारी कुत्र्यांनी त्याला पकडले.
तात्पर्य
- दुसर्यापेक्षा मी अधिक शहाणा अशी बढाई मारणार्यास त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही. पण ज्याला तो कमी शहाणा समजतो त्याचेच शहाणपण वेळेला उपयोगी पडते. एखाद्याला एकच विद्या चांगली येत असेल तर तिच्यामुळे जे काम होईल ते अनेक अपुर्या विद्यापासून होणार नाही.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 52
बैल आणि लाकूड
काही बैल एका इमारतीसाठी रानातून लाकूड ओढून नेत होते. बैलांचा तो कृतघ्नपणा पाहून त्या लाकडाला फार राग आला. ते बैलांना म्हणाले, 'अरे, जेव्हा मी रानात उभा होतो, तेव्हा माझा पाला तुम्हाला खायला दिला, 'माझ्या सावलीत तुम्ही सुखानं झोप घेतली. पण हे सगळं विसरून या दगडामातीतून तुम्ही मला ओढून नेता, तेव्हा तुमच्या ह्या वागण्याला काय म्हणावं ?' बैलांनी उत्तर दिले, 'आम्ही हे काम काही खुषीने करत नाही, आमच्याकडून ते जबरदस्तीने करून घेतलं जातं, हे जर तुझ्या लक्षात आलं तर तू आम्हाला नक्कीच दोष देणार नाहीस.'
तात्पर्य
- एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडून बळजबरीने जे काम करून घेतले जाते, त्याबद्दल त्याला दोष देणे योग्य नाही.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 53
अरण्य आणि लाकूडतोड्या
एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, 'तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?' तो म्हणाला, 'माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.' ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, 'मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.'
तात्पर्य
- शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 54
उंदीर आणि बैल
एक उंदीर एका बैलाच्या पायाला चावला आणि हळूच बिळात लपून बसला. बैल खूप चिडला आणि शिंग वर करून तो कोण चावले ते पाहू लागला. तेव्हा उंदीर हळूच बिळाच्या तोंडाशी आला व हसून म्हणाला, 'तू एवढा शक्तिमान पण माझ्यासारख्या क्षूद्र प्राण्याचा सुद्धा तुला प्रतिकार करता येत नाही तर तुझ्या शक्तीचा काय उपयोग ?'
तात्पर्य
- एखादा क्षूद्र प्राणीसुद्धा आपल्याला त्रास देऊ शकतो.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 55
शेतकरी आणि ससाणा
एक ससाणा एका कबुतराच्या मागे लागला होता. आणि तेवढ्यात तो एका शेतकर्याच्या जाळ्यात सापडला तेव्हा तो म्हणाला, 'दादा, मी काही तुझा अपराध केला नाही; तर तू मला सोडून दे.'
तेव्हा शेतकरी म्हणाला, 'तू माझा अपराध केला नाहीस, हे खरं पण मग त्या कबुतराने तरी तुझा काय अपराध केला होता ?'
जो न्याय तू त्याला लावलास तोच तुलाही लागू होतो तेव्हा मी तुला आता शिक्षा करणार !'
तात्पर्य
- इतरांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा असेल तर आपणही आपली वागणूक सुधारायला हवी.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 56
शेतकरी आणि रानडुक्कर
एकदा एका शेतकर्याच्या जाळ्यात एक रानडुक्कर सापडले. तेव्हा त्याने त्याचा एक कान कापून सोडून दिले. काही दिवसांनी ते पुन्हा सापडले. तेव्हा त्याने त्याचा दुसरा कान कापून सोडले. परंतु, तरीही तिसर्या वेळेसही ते त्याच्या जाळ्यात सापडेल तेव्हा त्याने त्याला ठार मारून त्याचे डोके फोडले आणि तो म्हणाला, 'खरंच की याच्या डोक्यात मेंदूच नाही. जर अक्कल असती तर दोनदा माझ्या हाती सापडल्यावर पुन्हा तो माझ्या जाळ्यात आलाच नसता.'
तात्पर्य
- ज्याच्यावर उपदेशाचा अथवा शिक्षेचा काडीमात्र परिणाम होत नाही अशा माणसाला शहाणे करणे ही अशक्य गोष्ट आहे.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 57
ससा आणि चिमणी
एकदा एक गरुड पक्षी एका सशाच्या मागावर टपून बसला होता. तिथे जवळच झाडावर एक चिमणी बसली होती. ती सशाला म्हणाली, 'अरे, तू किती मूर्ख आहेस ? तू एवढा चपळ असताना घाबरतोस का ? तू जर प्रयत्न करशील तर या गरुडाच्या हातून तू सहज सुटशील. चल ऊठ, पळ !' असं ती बोलत होती. इतक्यात एका ससाण्याने झडप टाकून तिला पकडले. तेव्हा ती केविलवाणे ओरडू लागली. ते पाहून ससा तिला म्हणाला, 'स्वतः एवढा धीटपणाचा आव आणून तू मला हिणवत होतीस, आता तू आपला जीव कसा वाचवतेस ते पाहू !'
तात्पर्य
- दुसर्याला शहाणपण शिकवणारे लोक स्वतः संकटात पडले की त्यांचे शहाणपण निरुपयोगी ठरते.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 58
पेटीतला उंदीर
एक उंदीर जन्मल्यापासून एका पेटीतच रहात असे. पेटीबाहेर जग आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. त्या घरची मोलकरीण त्याला जे पदार्थ खायला देत असे त्यावर तो खूष असे. परंतु, एकदा अचानक तो त्या पेटीतून बाहेर पडला आणि एक नवीनच खाण्याचा पदार्थ त्याच्या दृष्टीस पडला. तो पदार्थ खाऊन पाहिल्यावर तो स्वतःशीच म्हणाला. 'सगळं जग म्हणजे ही पेटी आहे असं मी समजत होतो हा माझा किती मूर्खपणा ?'
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक 59
पाण्यात पाहणारे सांबर
एक सांबर एकदा पाणी पीत असताना त्याला आपले प्रतिबिंब दिसले. तो मनाशीच म्हणाला, 'माझी ही शिंगं किती सुंदर आहेत. तसंच माझं तोंड, डोळे फुलासारखं अंग सगळं कसं सुंदर आहे. पण माझे पायही असेच सुंदर असते तर काय मजा झाली असती. हे इतके बारीक पाय असण्यापेक्षा नसलेले बरे !' असे तो म्हणत आहे तेवढ्यात एक सिंह तेथे आला. त्याची चाहूल लागताच सांबर आपल्या बारीक पायांनी जोरजोरात पळू लागले. सिंहही त्याच्या मागे लागला. परंतु रस्त्यातच सांबराची शिंगे एका झाडात अडकली. त्यामुळे त्याला पळता येईना. सिंहाने त्याच्यावर झडप घातली. तेव्हा सांबर म्हणाले, 'अरेरे ! ज्या पायांना मी वाईट म्हणत होतो त्यांनी संकटातून माझी सुटका केली. पण ज्या शिंगांचा मला गर्व वाटत होता त्यांनी मात्र मला ऐनवेळी दगा दिला.'
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
बोधकथा क्रमांक ६०
सिंह, लांडगा आणि कोल्हा
एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?'
तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'
सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.
तात्पर्य
- दुसर्याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️🎞️
No comments:
Post a Comment