LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Wednesday, July 6, 2022

बोधकथा 21 ते 30

 कथा क्रमांक - 21 


कोल्हा आणि रानडुक्कर

एक रानडुक्कर आपल्या दाढेला झाडाच्या बुंध्यावर धार लावत होता. तेथे कोल्हा आला व त्याला विचारू लागला, 'अरे, तुझ्यावर कोणी शत्रू चाल करून आल्याचं चिन्ह तर इथे काही दिसत नाही, असं असता तू उगाच आपली दाढ घासत बसला आहेस याचं कारण काय?' डुक्कर त्यावर म्हणाले, 'मित्रा, माझ्यावर कोणी चाल करून आलं नाही, हे खरं. पण रिकाम्या वेळात आपल्या हत्याराला धार लावून ते तयार ठेवणं बरं, कारण संकटाच्या वेळी तितकी तयारी करायला वेळ मिळेलच असं थोडंच आहे?'

तात्पर्य

- घराला आग लागल्यावर विहीर खणायला निघणे हे मूर्खपणाचे होय.

----------------------------------

 कथा क्रमांक - 22


कोकीळ आणि ससाणा

एक भुकेलेला ससाणा भक्ष्यासाठी फिरत असता त्याला एक कोकीळ सापडला. तो कोकीळ त्याला म्हणाला, 'भाऊ, मला सोड, मी इतका लहान आहे की मला खाल्ल्याने तुझं पोट नक्कीच भरणार नाही, मला सोडून देऊन माझे गाणे तासभर ऐकशील तर तुला आनंद होईल.' ससाणा म्हणाला, 'तू कितीही लहान असलास तरी माझ्यासारख्या भुकलेल्या प्राण्याला तुझ्या मासाचा बराच उपयोग होईल. शिवाय सापडलेला लहान पक्षी सोडून देऊन, मोठा पक्षी पकडण्याच्या नादी लागण्याइतका मी नक्कीच मूर्ख नाही.'

तात्पर्य

- हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे हा मूर्खपणा होय.

----------------------------------

 कथा क्रमांक - 23 


खेड्यातला उंदीर व शहराला उंदीर

एक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले. पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो, अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातला उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देउ लागला व तो चाखून 'अहाहा ! काय चविष्ट पदार्थ आहे हा !' असे म्हणून तो खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वैपाक घराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्‍या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'

तात्पर्य

- शहरात सुख फार पण त्याप्रमाणे दुःखेही फार. खेड्यात मजा कमी पण त्या मानाने दुःखे व संकटेही कमी असतात.

----------------------------------

 कथा क्रमांक - 24


काटे खाणारे गाढव

एका कुंभाराचे गाढव पाठीवर खाण्याचे पदार्थ घेऊन शेतात मालकाकडे चालले होते. जात असता वाटेत एक लहानसे बाभळीचे झुडूप त्याला दिसले. त्याचे कोवळे काटे व पाने खाण्यासाठी तो थोडा उभा राहिला व खात असता स्वतःशीच म्हणाला, 'माझ्या पाठीवर खाण्याचे इतके पदार्थ असता ते सोडून मी हे काटे खातो आहे हे पाहून लोकांना नवल वाटेल यात संशय नाही.'

तात्पर्य

- प्रत्येकाची आवड निराळी असते.

----------------------------------

 कथा क्रमांक - 25


कासव आणि बेडूक

नदीकाठी गवतात काही बेडूक खेळून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते. ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाटले. इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक घार आकाशातून उतरली व तिने सर्व बेडकांना खाऊन टाकले. ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले, 'अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेली बरी.'

तात्पर्य

- देवाने जे गुण जन्मतःच दिलेले असतात तेच हितकारक असतात.

----------------------------------

 कथा क्रमांक - 26


घुबड आणि टोळ

एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.


तात्पर्य


- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.

----------------------------------

 कथा क्रमांक - 27 


घोडा आणि सांबर

एक घोडा आणि सांबर कुरणात नेहमी चरत असत. एकदा त्या दोघांचे भांडण झाले व सांबराने घोड्याला आपल्या शिंगांच्या बळाने कुरणाबाहेर हाकलून दिले. तेव्हा सांबराची खोड मोडावी म्हणून तो माणसाजवळ गेला व आपल्याला मदत करण्याची त्याने त्यास विनंती केली. माणसाने घोड्याच्या पाठीवर खोगीर घातले, तोंडात लगाम दिला व घोड्यावर चढून बसला. फेरफटका मारताना त्याने घोड्याला चाबकाचे चार फटकारेही मारले. घोड्याने तो सर्व त्रास मुकाट्याने सहन केला व माणसाच्या हातून सांबराचा पराभव केला. नंतर तो त्या माणसाला म्हणाला, 'हे भल्या माणसा, माझं काम झालं. मी तुझा फार आभारी आहे. आता हे खोगीर आणि लगाम काढून घेऊन मला जाऊं दे.' त्यावर माणूस म्हणाला, 'अरे, तू इतका उपयोगी आहेस, हे आधी मला माहीत नव्हतं. आता या बंधनातून तुझी सुटका होईल असं मला वाटत नाही.'

----------------------------------

 कथा क्रमांक - 28


गरुड आणि कासव

एकदा एक कासव जमिनीवर चालून चालून कंटाळले. आकाशातून पृथ्वी कशी दिसते ते पहावे असे त्याला वाटू लागले. मग ते पक्ष्याकडे जाऊन म्हणाले की, 'जो कोणी मला आकाशातून फिरवील व सृष्टीचे वर्णन करून सांगेल त्याला मी पृथ्वीच्या पोटातील रत्‍नांच्या खाणी दाखवीन.' गरुडाने ही गोष्ट कबूल केली व आकाशातून पृथ्वीवरील सर्व आश्चर्ये दाखविली. मग खाली उतरल्यावर तो कासवाला म्हणाला, 'अरे, तुझ्या रत्‍नाच्या खाणी कुठे आहेत ते दाखव.' त्यावेळी त्या कासवाने वेड्याचे सोंग घेऊन गरुडाला फसविण्याचे ठरविले. ती त्याची लबाडी पाहून गरुडाला फार राग आला व त्याने कासवाच्या नाजूक ठिकाणी आपली नखे रोवून त्याला मारून टाकले.


तात्पर्य


- बोलल्याप्रमाणे वागले नाही तर लोक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

----------------------------------

 कथा क्रमांक - 29


गरुड आणि चंडोल

एका चंडोल पक्ष्याला स्वतःच्या शहाणपणाबद्दल फार गर्व होता. सगळ्या पक्ष्यांची राज्यसूत्रे आपल्या हाती आल्याशिवाय सगळे पक्षी सुखी होणार नाहीत, असे त्याला वाटत असे. म्हणून एकदा त्याने गरुडाला, 'मला आपल्या प्रधानमंडळात घ्या,' अशी विनंती केली. तो म्हणाला, 'महाराज सदर जागेला मी योग्य आहे. माझा आवाज गोड आहे, मी अगदी जलद उडतो, हे तुम्हाला माहीत आहे. याशिवाय माझ्या अंगी बरेच चांगले गुण आहेत.' याप्रमाणे तो स्वतःची स्तुती करीत आहे तोच त्याला थांबवून गरुड म्हणाला, 'अरे, तुला वरचेवर भटकत फिरण्याची आणि सगळा दिवस बडबड करण्याची इतकी सवय आहे की, तुला जर माझ्या प्रधानमंडळात घेतलं तर तुझ्यासारख्या निरुपयोगी पक्ष्यांची निवड केल्याबद्दल सगळे पक्षी मला नावं ठेवतील.'


तात्पर्य


- मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक महत्त्वाच्या जागांना बहुधा नालायक असतात.

----------------------------------

 कथा क्रमांक - 30


गाडीवाला गाडीचे चाक

एक गाडीवाला आपली गाडी रस्त्याने चालवत असता त्या गाडीचे चाक कमी मजबूत असल्याने ते करकरू लागले. तेव्हा तो गाडीवाला त्या चाकाला म्हणाला, 'दुसरे चाक गुपचूप आपले काम करत असता तूच जो एवढा आवाज काढतोस, याचं कारण काय?' चाक म्हणाले, 'गाडीवान दादा, त्रास होऊ लागला म्हणजे कुरकुर करावी नि रडावं लागतं. माझ्यासारख्या अशक्तांचा तो हक्कच आहे.'


तात्पर्य


- ज्याची प्रकृती ठीक नाही किंवा ज्याला शक्तीपलीकडे काम करावे लागते त्याने तक्रार करणे साहजिकच आहे.

----------------------------------


No comments:

Post a Comment