LEARN WITH FUN या शैक्षणिक ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत.

TIME


Tuesday, June 28, 2022

बडबडगीते

 एक होता काऊ

-------------------------------

एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला

"मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ"


एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला

"तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट"


एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली

"तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस"


एक होती गाय, तिने चिमणीला विचारले

"तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय ?"


एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले

"मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव"

 🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

बोलक पसरून खुदुखुदु हसायचं,

----------------------------------


बोलक पसरून खुदुखुदु हसायचं,

भोकाड पसरून धो-धो रडायचं !

घर-भर फिरायचं, हव ते मागायचं,

कोणालाच नाही जुमानायचं,

असं हे बालपण ! असं हे बालपण !

गोड गोड गोजिरवाणी !

देवाजीच सुंदर लेण !

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

-----------------------------------

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला


चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार

शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार


गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन

"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !


बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार

पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल


चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो

मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो


उंच उंच झोक्याचा खेळ रंगला

मैनेचा पिंजरा वर टांगला


किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला

चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

कोण? कोण?

---------------------------------

पहाट झाली - सांगत कोण?

कुकुद्मच् - आणखी कोण?

विठू-विठू पोपट - आणखी कोण?

ताजं-ताजं दूध - देत कोण?

गोठयातली हम्मा - आणखी कोण?

चोरुन दूध - पितं कोण?

म्यॉव म्यॉव माऊताई - आणखी कोण?

घराची राखण - करतं कोण?

भू: भू: कुत्रा - आणखी कोण?

बागेतली भाजी - खातं कोण?

मऊ मऊ ससेभाऊ - आणखी कोण?

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

ये रे ये रे पावसा

-----------------------------------

ये रे ये रे पावसा

तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा

पाऊस आला मोठा

पाऊस पडला झिम् झिम्

अंगण झाले ओले चिंब

पाऊस पडतो मुसळधार

रान होईल हिरवंगार.

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

आपडी थापडी

------------------------------

आपडी थापडी

गुळाची पाडी!

धम्मक लाडू

तेल काढू!

तेलंगीचे एकच पाव

दोन हाती धरले कान!

चाऊमाऊ चाऊमाऊ

पितळीतले पाणी पिऊ

हंडा-पाणी गडप!

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

करंगळी, मरंगळी

---------------------------

करंगळी, मरंगळी

मधल बोट, चाफेकळी,

तळहात - मळहात,

मनगट - कोपर,

खांदा-गळागुटी-हनुवटी,

भाताचं बोळकं,

वासाचं नळक,

काजळाच्या डब्या,

देवाजीचा पाट,

देवाजीच्या पाटावर,

चिमण्यांचा किलबिलाट.


🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

भटो भटो

--------------------------

भटो भटो

कुठे गेला होतात?

कोकणात

कोणातून काय आणले?

फणस

फणसात काय?

गरे

गर्‍यात काय?

आठिळा

तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे

म्हशीला काय?

चार खंड

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

लव लव साळूबाई

-----------------------------------

लव लव साळूबाई, मामा येतो

झुक झुक गाडीतून - नेईन म्हणतो

अटक मटक मामी येते

छानसा बॅट-बॉल देईन म्हणते

अबरू-गबरु येतो बंटया

देईन म्हणतो-सगळया गोटया

नको-नको मी इथंच बरा

आईच्या कुशीतच आनंद खरा


🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

चांदोबा  लपला

---------------------------------

चांदोबा लपला

झाडीत....

आमच्या मामाच्या

वाडीत....

मामाने दिली

साखरमाय....

चांदोबाला

फुटले पाय....

चांदोबा गेले

राईत....

मामाला नव्हते

माहीत....

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

आता मी धावणार

------------------------------

मोहोर लाजत लाजत हळूच सांगतो . . .


आता आंबा येणार, आता आंबा येणार !


बाळ पाऊल टाकत . . . टाकत हळूच सांगतो . . .


आता  मी धावणार, आता  मी धावणार !

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

आली सुट्टी… आली सुट्टी…

----------------------------


आली सुट्टी… आली सुट्टी…


आली - आली - रे !


चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे …


अभ्यासाशी नकोच गट्टी, जोरदार कट्टी रे …


नाचू - गाऊ - उड्या मारू, शिट्टी वाजवू रे…


शिबीरांचा नकोच मारा, मोकाट हिंडू रे …


हिरव्या रानचा पिऊन वारा, झोके घेऊ रे …


आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे !

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

उंदीरमामा आणि मनीमावशी -

-------------------------------

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

ऐकू आली फोनची रिंग -

कुणीच नाही फोनपाशी

उंदीरमामा बिळापाशी !


उंदीरमामा हसले मिशीत ,

टेबलावरती चढले खुषीत -


फोन लावला कानाला

जोरात लागले बोलायला -


" उंदीरमामा मी इकडे ;

कोण बोलतय हो तिकडे ? "


- विचारले मामानी झटकन

उत्तर आले की पटकन-


" मी तुमची मनीमावशी,


कालपासून आहे उपाशी ."

- मनीमावशी भलती हुषार ,

टुणकन मामा बिळात पसार !!

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

उठा उठा चिऊताई

----------------------


उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले

अजूनही अजूनही ।।धृ।।


सोनेरी हे दूत आले

घरट्याच्या दारापाशी

डोळ्यांवर झोप कशी

अजूनही अजूनही ।।१।।


लगबग पाखरे ही

गात गात गोड गाणे

टिपतात बघा दाणे

चोहीकडे चोहीकडे ।।२।।


झोपलेल्या अशा तुम्ही

आणायाचे मग कोणी

बाळासाठी चारापाणी

चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।


बाळाचे मी घेता नाव

जागी झाली चिऊताई

उठोनिया दूर जाई

भूर भूर भूर भूर ।।४।।

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

जाऊ का ग आई खेळायला?

----------------------------

पावसाची सर आली बोलवायला,

जाऊ का ग आई खेळायला?


गर गर गिरकी मारायला . . .

भर भर गारा वेचायला !



जाऊ का ग आई खेळायला ?

पाण्यात नावा सोडायला

अन टप टप तालावर नाचायला


जाऊ का ग आई खेळायला

🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

No comments:

Post a Comment