बैल पोळा - निबंध
--------------------------------
श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सण उत्सवांची रेलचेल सुरू होते. पावसाचे दिवस असल्याने सृष्टीचे सौदर्यही खुलून दिसते. अश्या या श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांनंतर सरत्या श्रावणात येतो बैल पोळ्याचा सण. संपूर्ण महाराष्ट्रात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार हा सण. शेतकरी बांधवांसाठी पोळा सणाचे महत्व खूप आहे.
बैलपोळ्याचा दिवस शेतकऱ्यांची बैलांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. वर्षभर शेतात कष्ट करून राबणाऱ्या आणि शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून शेतीत मदत करणाऱ्या बैलाला या दिवशी पुजले जाते. बैलपोळ्याच्या दिवशी सर्वात आधी शेतकरी भल्या पहाटे उठून बैलांच्या गळा आणि नाकातील दोर काढतात. यानंतर त्यांना आंघोळ घालून तयार केले जाते. जर जवळपास नदी अथवा तलाव असेल तर त्या ठिकाणी अंघोळीसाठी नेले जाते. अंघोळ घातल्यानंतर शेतकरी लोक आपल्या बैलांना छान सजवतात. त्यांच्या शिंगांना रंग लावून अंगावर झुल घातली जाते.
यादिवशी बैलांना पुरणपोळी चे जेवण असते. काही ठिकाणी बाजरी ची खिचडी सुद्धा बैलांना खाऊ घातली जाते. यादिवशी सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते. सायंकाळच्या वेळी गावातील सर्व लोक आपापल्या बैलांना घेऊन गावाच्या मोकळ्या चौकात जमतात. बैलपोळ्याच्या दिवस शेतकरी आणि शेतात काम करणारे बैल व इतर सर्व प्राण्यांच्या विश्रांतीचा दिवस असतो. म्हणून या दिवशी कोणतेही काम केले जात नाही. यानंतर संध्याकाळच्या वेळी घरातील महिला आपापल्या बैलाची आरती ओवाळून पूजा करतात. ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते.
भारतीय संस्कृती मनुष्या सोबतच निसर्ग आणि प्राणीमात्रांची देखील पूजा करायला शिकवते. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये बैलपोळ्याची एक प्राचीन कथा देखील पहावयास मिळते. या कथेनुसार एकदा भगवान शंकर आणि देवी पार्वती सारीपाठ चा खेळ खेळत असतात. त्यावेळी देवी पार्वतीने खेळाचा डाव जिंकला परंतु भगवान शंकर म्हणाले की हा खेळ मी जिंकला. या विषयावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या खेळाचा साक्षी म्हणून समोर भगवान शंकराचा नंदी बसलेला होता. त्यावेळी शंकरांनी नंदी ला विचारले की तू सांग डाव कोणी जिंकला. नंदिने शंकराची बाजू घेत त्यांनी जिंकला म्हणून सांगितले. त्यावेळी देवी पार्वतीने रागात येऊन नंदीला शाप दिला की पृथ्वीलोकावर तुझ्या मानेवर जू बसवण्यात येईल व तुला खूप कष्ट करावे लागेल.
हा श्राप ऐकून नंदीला त्याची चूक लक्षात आली व त्याने देवी पार्वतीची क्षमा मागितली. यानंतर देवी पार्वतीने त्याला माफ करीत एक वरदान दिले की जरी तुला कष्ट करावे लागत असले तरी वर्षातून एक दिवस तुझ्यासाठी आनंदाचा राहील. या दिवशी तुझी देवा प्रमाणे पूजा केली व तुला छान छान भोजन खाऊ घालण्यात येईल आणि हाच तो बैलपोळ्याच्या दिवस तेव्हापासून पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
No comments:
Post a Comment